पालघर : चवीला कडू असलेले कारले शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. प्रति एकरी ५० ते ६० हजार रुपये लागवड खर्चातून दीड ते दोन लाखांचे उत्पन्न मिळत असल्याने पालघर तालुक्यातील शेतकरी कारले या नगदी पिकाच्या लागवडीकडे वळत आहेत. यंदा कारले लागवडीचे क्षेत्र वाढले असून शंभर एकरच्या जवळपास लागवड पालघर तालुक्यात करण्यात आली आहे.
पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील सावरे एम्बुर, ऐरंबी आणि पाचुधारा भागातील शेतकऱ्यांनी कारल्याची मोठी लागवड केली आहे. सावरे एम्बुर, एरंबी आणि पाचुधारा भागात खरीप हंगामातील भातशेतीनंतर रब्बी हंगामात नगदी पीक म्हणून कारल्याची लागवड केली जाते. लहान मोठे शेतकरी एक एकरापासून पाच एकरापर्यंतच्या भाडेपट्टय़ातील अथवा मालकीच्या शेतीजमिनीवर कारल्याची लागवड करतात. कारले लागवडीत आंतर पीक म्हणून काकडीची लागवड केली जात आहे. शेतीच्या मशागतीनंतर कारले लागवड आणि प्रत्यक्ष कारल्याचे उत्पादन येण्यासाठी महिन्याचा कालावधी लागतो, दरम्यान आंतर पीक असलेल्या काकडीला बाज येऊन उत्पादन सुरू होत असल्याने काकडी विक्रीतून कारल्याचे उत्पादन सुरू होण्यापूर्वीचा खर्च निघतो, शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते. आंतर पीक म्हणून लावलेल्या काकडीला प्रतिकिलो १० ते १२ रुपयांचा दर मिळतो.
एक हेक्टर क्षेत्रात जवळपास साडेसहा हजार कारल्याच्या रोपांची लागवड केली जाते. रोपलागवड, औषध फवारणी, मजुरी, शेतीच्या भाडय़ापोटी साडेतीन लाख रुपये जवळपास खर्च येतो. जानेवारीदरम्यान पीक येते. संक्रांतीनंतर कारल्याला चांगली मागणी येते, तर त्याला दरही चांगला मिळतो. एका हेक्टरला प्रति महिना १२ टन कारल्याचे उत्पादन येणे अपेक्षित आहे. हंगामाच्या शेवटी संपूर्ण खर्च वजा जाता एकरी दोन लाख रुपये उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे.
माल्चिंग पेपरवर लागवड
खते आणि कीटकनाशकांचे दर वाढल्याने खर्चात वाढ झाली आहे. प्रति एकरी ३० हजारांच्या खर्चात वाढ झाल्यामुळे खर्च ५० ते ६० हजारांवर गेला आहे. पाण्याचा अपव्यय, अनावश्यक वाढणारे गवत आणि खर्चात कपात करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी माल्चिंग पेपरवर लागवड केली असून, सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर सुरू केला आहे.