बोईसर : बोईसर परिसरातील वाहनांच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सिडको बायपास रस्त्याचे काम रखडले आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत असून अन्यथा या विरोधात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
बोईसर सरावली मधील सिडको बाह्यवळण आणि ओसवाल परिसरातील मीनाक्षी हॉटेल ते गणेश मंदिर या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या दोन रस्त्यांच्या कामांना डिसेंबर महिन्यात मंजुरी मिळून निविदा काढण्यात आल्या. सिडको बायपास मार्गासाठी ४० लाख आणि ओसवाल रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ८३ लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मंजूर करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ओसवाल परिसरातील मीनाक्षी हॉटेल ते गणेश मंदिर रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम कंत्राटदाराकडून सुरू करण्यात आले असून सिडको बायपास रस्त्याच्या कामाला मात्र अजून पर्यंत मुहूर्त मिळालेला नाही.
सिडको बायपास रस्ता हा बोईसर तारापूर मुख्य रस्त्याला जोडणारा महत्त्वाचा पर्यायी रस्ता आहे. वाहतुकीसाठी कमी अंतराचा व सोयीचा असल्याने दररोज हजारो वाहने, औद्योगिक परिसरात ये जा करणारे कामगार व स्थानिक नागरिक या रस्त्याचा प्रामुख्याने वापर करतात. तारापूर मार्गावरून नवापूर रस्ता व बोईसर चिल्हारमार्गे जाण्यासाठी सिडको बायपास रस्ता हा जवळचा पर्यायी मार्ग आहे. या रस्त्यामुळे बस स्थानकासमोर तारापूर रस्त्यावर नेहमी होणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. एकूण पाचशे मीटर अंतराच्या या बायपास मार्गाचे ४०० मीटर अंतराचे दोन टप्प्यात काँक्रिटीकरण काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र उर्वरित १०० मीटर अंतराचा भाग आवश्यक निधी अभावी गेल्या दोन वर्षांपासून रखडला आहे. पावसाळ्यात चिखलामुळे रस्ता निसरडा होत असल्याने दुचाकी चालकांचे अनेक अपघात या ठिकाणी झाले आहेत. अपूर्ण स्थितीत असलेल्या या रस्त्याला निधी मंजूर झाल्याने संपूर्ण रस्ता पक्का होऊन वाहतुकीसाठी सोयीस्कर ठरणार आहे.
सिडको बायपास रस्त्यासाठी मंजुरी मिळून कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देखील देण्यात आला आहे. बायपास रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे यासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाचे शहर प्रमुख अतुल देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले होते. मात्र पावसाळा तोंडावर असताना देखील काम सुरू होत नसल्याने या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाने रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बोईसर मधील सिडको बायपास रस्त्याचे काम दोन दिवसानंतर सुरू करणार आहोत. रस्त्याच्या मध्ये येणारी झाडे काढण्याबाबत जमीन मालकाला कळवण्यात आले आहे. – आशिष संखे कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर