पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) मार्फत राबविण्यात येत असलेल्या “निपुण पालघर, गुणवत्ता विकास अभियान” अंतर्गत तयार करण्यात आलेल्या कृती पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा जिल्हा परिषद पालघर येथे उत्साहात पार पडला.
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून १ ऑगस्ट ते ३० ऑक्टोबर या कालावधीत ४५ दिवसांचे साचेबद्ध कृती कार्यक्रम सर्व जिल्हा परिषद मराठी शाळांमध्ये राबविण्यात येणार आहेत. कृती पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, डाएटचे प्राचार्य संभाजी भोजने, जिल्हा समन्वयक तानाजी डावरे तसेच जिल्ह्यातील विविध शाळांतील ८४ शिक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
जिल्ह्याची वैशिष्ट्ये अधोरेखित करणारी, समजेल अशा भाषेत तयार केलेली ही पुस्तिका म्हणजे एक अभिनव संकल्पना आहे. कमी वेळात शिक्षकीय कष्टातून तयार झालेली ही पुस्तिका विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी असल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित शिक्षकांचे अभिनंदन केले. या उपक्रमात योगदान देणाऱ्या व नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना सेवेत पदोन्नती आणि इतर लाभ तर मिळतील, मात्र त्यांना खरे समाधान कामातून मिळेल असे त्यांनी सांगितले.
या कृती पुस्तिकेत भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांतील वाचन, लेखन, संख्याज्ञान, गणितीय क्रिया यावर आधारित एकूण १३५ कृती (प्रति इयत्ता) देण्यात आल्या आहेत. वर्गशिक्षकांनी दररोज तीन कृती वर्गात घेऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे अपेक्षित आहे. यासाठी विद्यार्थ्यांना घरी गृहपाठही दिला जाणार असून या उपक्रमात पालकांचाही सहभाग अपेक्षित आहे.
तसेच या अभियानातून प्रत्येक शाळा, केंद्र व तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेता येणार असून यु-ट्यूब लिंक, क्यूआर कोड, शिक्षण पेट्यांचा वापर यामुळे शिक्षण अधिक उपयुक्त, जिज्ञासू व आनंददायी होणार असल्याचे मत शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे. “निपुण पालघर” अभियान आणि कृती पुस्तिका हे उपक्रम रचनात्मक शिक्षणाकडे वाटचाल घडवणारे ठरणार असून, यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्तात्मक प्रगती होईल असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.