बोईसर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील दुर्वेस येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन सन २०२५-२५ या शैक्षणिक वर्षात शाळेत प्रवेश घेणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी आदिवासी बहुल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच इतर उपक्रमातील प्रत्यक्ष सहभाग बघून मुख्यमंत्री चांगलेच प्रभावित झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके आणि खाऊ वाटप केला. शाळा आवारातील डिजिटल वर्गखोली , आयसिटी लॅब, प्रयोगशाळा, ग्रंथालय, औषधी वन उद्यान यांची पाहणी करून दुर्वेस जिल्हा परिषद शाळेने विद्यार्थी सहभागातून राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शैक्षणिक प्रगतीकरिता शिक्षण विभागासोबतच शिक्षक आणि पालकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी दुर्वेस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसोबत मनमोकळा संवाद साधला. शैक्षणिक प्रगतीसोबतच गणवेश, पाठ्यपुस्तके, मध्यान्ह भोजन व्यवस्थित आणि वेळेत मिळतात की नाही हे विद्यार्थांकडून जाणून घेतले. पाचवी इयत्तेतील अनुज साबला या विद्यार्थ्यांने मुख्यमंत्र्यांना डिजीटल फलकावर अभ्यासक्रमाचे सादरीकरण करून दाखवले. विद्यार्थ्यांचे मराठी भाषेसह इंग्रजी,गणित आणि विज्ञान विषयांची असलेलीआवड बघून मुख्यमंत्री खुश झाले.
दुर्वेस येथील जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थी हे त्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांची अत्यंत चांगल्या प्रकारे उत्तरे देत असल्याने त्यांची शैक्षणिक तयारी बघून मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. आपल्या गावची शाळा ही आपली असते आपल्या गावच्या शाळेला आपण पालकत्व देण्यासोबतच राज्य सरकार विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन, संपूर्ण गणवेश आणि पाठ्यपुस्तके मोफत देत असून मुलानी शिकून आपल्या जीवनाचा विकास करावा. त्याचसोबत रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडत असून अशा मुलांची शाळा सुटू नये यासाठी त्यांच्या पालकांचे प्रबोधन किंवा वेळप्रसंगी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
पावसामुळे प्रशासकीय यंत्रणांची तारांबळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्वेस येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली आणि त्यानंतर मनोर येथे आयोजित प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग उपक्रमाचा शुभारंभ केला. पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला फटका बसला. जोरदार पावसामुळे कार्यक्रम स्थळी चिखल झाला होता. कार्यक्रमात उपस्थितांना असुविधांचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे कार्यक्रमाची तयारी आणि सुरक्षा व्यवस्था सांभाळताना शासकीय व पोलीस यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडताना दिसली.