पालघर : मतदार यादीत दुबार असणारी नाव वगळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी लक्षपूर्वक कारवाई करावी तसेच नव्याने मतदार नोंदणी होताना दुबार नावाची नोंदणी होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी दिल्या आहेत. निवडणूक कामांमध्ये कसूर करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याबाबतच्या सूचना त्यांनी विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिल्या आहेत.
नालासोपारा विधानसभा क्षेत्रात एका महिलेचे एकापेक्षा अधिक ठिकाणी नाव नोंदले गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणात चौकशी करून या महिलेची सर्व दुबार नावे रद्दरद्द करण्यात आली आहेत. १३२- नालासोपारा मतदारसंघात सुषमा गुप्ता यांनी जानेवारी २०२४ च्या सुमारास मतदार यादीत नाव नोंदवण्याच्या दृष्टीने नाव नोंदणीचा फॉर्म क्रमांक – ६ ऑनलाइन पद्धतीने दाखल केला होता. ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर त्वरित मतदार कार्ड मिळेल असा त्यांचा समज होता. तथापि, हा अर्ज केल्यानंतर एपिक कार्ड त्वरित न मिळाल्याने त्यांनी पुन्हा नव्याने ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणीचा फॉर्म क्रमांक-६ एकूण सहा वेळा भरल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी भरलेल्या सहा अर्जांपैकी एक नोंद कायम ठेवून इतर पाच नावाच्या नोंदी वगळण्यासाठी फॉर्म क्रमांक-७ भरून घेण्यात आला आहे असे निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ही बाब निदर्शनास आल्यानंतर संबंधित मतदान केंद्रस्तरीय यंत्रणेला या तसेच इतर कोणत्याही मतदाराकडून दुबार मतदान होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व बीएलओ यांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील दुबार मतदार शोधण्याचे काम हाती घेण्यात आले असून दुबार नाव असणाऱ्या मतदारांनी नमुना अर्ज ७ भरून आपले मतदार यादीत नाव एकाच ठिकाणी ठेवण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात आले आहे. सर्वच बीएलओ यांना त्यांच्या कडे असणाऱ्या मतदार यादी भागाची काटेकोर पडताळणी करून आवश्यक तेनुसार दुबार मतदारांचे फॉर्म क्रमांक – ७ भरून घेण्याच्या व त्यावर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदार यादीच्या आगामी काळात होणाऱ्या पुनरिक्षण कार्यक्रमात देखील अशाच पद्धतीने दुबार नावे वगळण्यासाठी काटेकोर तपासणी व कार्यवाही करण्याच्या सूचना देखील जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पालघर यांनी सर्व निवडणूक यंत्रणेला दिल्या आहेत.
बीएलओ यांचा निष्काळजीपणा ?
गेल्या काही वर्षांपासून नालासोपारा व बोईसर विधानसभा क्षेत्रांमध्ये मोठ्या गतीने नव्या मतदारांची नोंदणी होत आहेत. कोणत्याही नागरिकांनी मतदार म्हणून ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याच्या निवासाबाबत बीएलओ यांनी स्थळ पाहणी करून अर्जासोबाबत अहवाल जोडणे अभिप्रेत आहे. तसेच त्यानंतर संबंधित विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर नव्याने नोंदणी होऊ पाहणाऱ्या मतदारांची नावे प्रकाशित होणे व त्यावर आक्षेप, हरकती मागवणे अपेक्षित आहे. मात्र महानगरपालिका क्षेत्रातील काही भागांमध्ये बीएलओ यांच्या बेजबाबदारपणामुळे अर्ज करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मतदार यादीत नाव नोंदवले जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
मतदार पुनर्नरीक्षण कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व बीएलओ संबंधित यांनी मतदारांच्या निवासाच्या ठिकाणी जाऊन स्वतः त्यांचा अधिवास असल्याची खात्री करणे अपेक्षित आहे. मात्र या कामांमध्ये देखील चालढकल होत असल्याने जिल्ह्यातील विशिष्ट भागांमधील मतदारांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे आरोप होत आहेत. जिल्हाधिकारी यांनी बीएलओ यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे सूचित केल्याने आगामी काळात होणारी मतदार यादीची अधिक गांभीर्याने होईल अशी अपेक्षा आहे.