पर्यायी खासगी वाहतूक सेवा पालकांसाठी आर्थिक भुर्दंड
पालघर: एसटी बससेवा बंद असल्यामुळे ग्रामीण भागांमधून शहरी भागांमध्ये तसेच तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पर्यायी खासगी वाहन व्यवस्थेत या विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसत असून त्रासदायक प्रवासाचा सामना करावा लागत आहे. पालघरमध्ये सध्या ८६ कर्मचाऱ्यांच्या सेवेत दिवसभरात एसटीच्या बसच्या १३३ फेऱ्या होत असून सुमारे चार हजार प्रवासी त्याचा लाभ घेत आहेत.
पालघर तालुक्याच्या ग्रामीण भागातून पालघर येथील दांडेकर व चाफेकर महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षणासाठी मोठय़ा प्रमाणात येत आहेत. विद्यार्थ्यांना दहा ते २० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर महाविद्यालयासाठी पार करावे लागत असल्याने एसटी बससेवा उपयुक्त आहे. एसटीच्या संपामुळे त्यांना अनेक वाहने बदलून प्रवास करावा लागत आहे. यासाठी २०० ते ३०० रुपयांच्या जवळपास खर्चही येतो हा खर्च विद्यार्थ्यांच्या पालकांना परवड नाही.
एसटी सेवा बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील सुमारे २५ ते ३० टक्के विद्याार्थी एसटी सेवेपासून वंचित आहेत व त्यांना आर्थिक भुर्दंडचा सामना करावा लागतो. महाविद्यालये लवकरच सुरू होत आहेत, या पार्श्वभूमीवर तरी एसटी बस विद्यर्थ्यांसाठी सुरू करावी अशी प्रमुख मागणी पुढे येत आहे.
संप सुरू असल्याने एसटी विभागाने आतापर्यंत ९१ विविध आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचे आदेश दिले आहेत. बारा जणांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून २२८ जणांची बदली करण्यात आली आहे. तर ३९७ कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. अर्नाळा व सफाळे बस आगारमधून दररोज सुमारे १० टक्के सेवा सुरू आहे. मात्र ही सेवा अपुरी असल्याचे सांगितले जाते.
विद्यार्थ्यांची होत असलेली अवहेलना आम्ही समजू शकतो एसटी संप मिटावा यासाठी वरिष्ठ स्तरावरून कर्मचाऱ्यांचे प्रबोधन सुरू आहे. विद्यार्थ्यांचे होत असलेले हाल व आर्थिक हानी लक्षात घेत चालक व वाहक आणि निदान त्यांच्यासाठी तरी कामावर यावे असे आवाहन आम्ही केले आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
अतिदुर्गम तालुक्यातील शेकडो विद्यार्थी बससेवा सुरू नसल्याने महाविद्यालयांमध्ये येऊ शकत नाहीत. खासगी वाहतुकीचा पर्याय परवडत नसल्याने त्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. विविध तांत्रिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिकाअभावी खूपच नुकसान होत आहे.
– डॉ. किरण सावे, प्राचार्य, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय
एसटी संपामुळे मुलीला पालघर येथे जाण्यासाठी पायपीट करावी लागते. चार वेळा वाहने बदलावी लागतात त्यात बराचसा वेळ वाया जातो. रोजचा खर्चसुद्धा परवडत नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यास विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर होईल.
– नयना धुमाळ, पालक