scorecardresearch

सीआरझेड क्षेत्रात ग्रामपंचायतीचेच बांधकाम; बोर्डीमध्ये प्रकार उघडकीस

डहाणू तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाण असलेल्या बोर्डी समुद्रकिनाऱ्यावर काही ठिकाणी सीआरझेड क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकाम उभी राहिली आहेत.

loksatta
प्रतिनिधीक छायाचित्र

पालघर: डहाणू तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाण असलेल्या बोर्डी समुद्रकिनाऱ्यावर काही ठिकाणी सीआरझेड क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकाम उभी राहिली आहेत. काही ठिकाणी अशी बांधकामे खुद्द ग्रामपंचायतीमार्फतच करण्यात आली असल्याचे उघडकीस आले आहे. तर इतर ठिकाणी असा अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाई करण्यास ग्रामपंचायत तसेच महसूल विभाग चालढकल करीत असल्याचे दिसून आले आहे.
राज्यातील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर स्थानिकांकडून अतिक्रमण केले जात असताना सीआरझेड नियमांच्या अनुषंगाने समुद्रकिनाऱ्यावर पक्के बांधकाम किंवा अनधिकृत शेड उभारणे नियमबाह्य आहे. असे असताना बोर्डी ग्रामपंचायतीने २०१९ मध्ये कुंभारवाडय़ामध्ये नाना-नानी पार्क अशा प्रतिबंधित क्षेत्रात उभारले होते. त्या ठिकाणी कालांतराने नूतनीकरणाच्या निमित्ताने खर्च केला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याच बरोबरीने कॅम्पिंग ग्राऊंडच्या मागे पर्यटकांसाठी ग्रामपंचायतीने खाद्यपदार्थाचे लहान दुकाने थाटली आहेत. त्याच्या लगत मोठय़ा क्षेत्रफळावर पेव्हर ब्लॉक बसवणे तसेच तात्पुरती शेड उभारून आसन व्यवस्था केल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित अवैध बांधकामाविरुद्ध कारवाई करण्याचे डहाणू गटविकास अधिकारी यांना सूचित करण्यात येईल असे सांगितले. दरम्यान, पर्यटन केंद्रांच्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी असून ती काटेकोरपणे पाळल्यास बोर्डी ग्रामपंचायत असमर्थ ठरल्याचे दिसून आले आहे.
सूचित करूनही कारवाई नाही
बोर्डी कुंभारवाडय़ातील नाना-नानी पार्कसंदर्भात अनेकदा तक्रारी केल्यानंतर संबंधित अनधिकृत व सीआरझेडमधील बांधकामांविरुद्ध कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधितांना सूचित केले होते. मात्र प्रत्यक्षपणे त्याविरुद्ध कोणतीही कारवाई झाली नाही. या अनधिकृत बांधकामात ग्रामपंचायतीचे काही विद्यमान पदाधिकारी सहभागी असून संबंधित ग्रामसेवकांनी अशा अनधिकृत बांधकामांकडे सोयीस्करपणे कानाडोळा करत असल्याचे आरोप होत आहेत.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Construction of gram panchayat crz area only type revealed in the board amy

ताज्या बातम्या