|| विजय राऊत
बंदी असल्यामुळे पर्यटकांमध्ये निरुत्साह, व्यावसायिकांची अर्थव्यवस्था कोलमडली
कासा : पालघर जिल्ह्यात जव्हार हे थंड हवेचे ठिकाण तसेच पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आल्यामुळे पर्यटकांमध्ये निरुत्साह असून व्यावसायिकांचे अर्थचक्र कोलमडले आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार या थंड हवेच्या ठिकाणाला मिनी महाबळेश्वार म्हणूनही संबोधले जाते. समुद्रसपाटीपासून दीड-पावणेदोन हजार फूट उंचीवर असल्याने येथील हवा थंड व अल्हाददायक आहे. तिन्ही ऋतूंत जव्हारला पर्यटकांची ये-जा असते. जव्हारचा जयसागर धबधबा, देवबागचा धबधबा, सूर्योदय व सूर्यास्ताचे मनोरम दृश्य, जव्हारचा भुईकोट, इतिहासप्रसिद्ध जुना आणि नवा राजवाडा, शिरपामाळ आणि आदिवासी संस्कृती त्यांची तारपानृत्ये, तेथील विविध वाद्ये, आदिवासींची देवदेवता, वारली चित्रकला, कलात्मक खेळणी, इत्यादी पाहण्यासाठी पर्यटकांची पावले इकडे आपसूक वळतात. हजारोंच्या संख्येने येथे पर्यटक येत असतात.
पर्यटकांसाठी येथे हॉटेल, रिसोर्टमध्ये राहण्याची जेवणाची उत्तम सोय आहे. येणाऱ्या पर्यटकांमुळे हॉटेल व्यवसाय, वाहन व्यवसाय, परिसरातील प्रचलित खाद्यपदार्थ विक्री या माध्यमातून येथील नागरिकांना चांगला रोजगार मिळत असतो. शिवाय अनेक आदिवासी स्थानिकांना विविध वाद्ये, वारली चित्रकला, कलात्मक खेळणी, स्थानिक खाद्यपदार्थ विक्रीतून रोजगार उपलब्ध होत असतो. रिसोर्ट, हॉटेल या ठिकाणीही रोजगार मिळत असतो. जव्हार परिसरात साधारणपणे २५ ते ३० लहान-मोठे हॉटेल, रिसॉर्ट आहेत. करोनामुळे हे व्यावसाय डबघाईला आले आहेत.
करोनाकाळाच्या पूर्वी एका हॉटेलमध्ये साधारण १५ ते २० स्थानिक नागरिकांना रोजगार मिळत होता. अशा सर्व हॉटेलमधून ३५० ते ४०० लोकांना रोजगार मिळत होता. तसेच रानभाज्या, कलाकुसरीच्या वस्तू विकून ३०० ते ३५० नागरिकांना उपजीविकेचे साधन मिळत होते. त्यामुळे जव्हारमधून बाहेर कामासाठी जाणाऱ्या मजुरांचे स्थलांतर कमी झाले होते. मात्र करोनाचे संकट ओढवल्याने वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता वेळोवेळी टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटक जव्हारकडे पाठ फिरवू लागल्याने पर्यटनाच्या माध्यमातून मिळणारा रोजगार बंद पडला. त्यामुळे आता करायचे काय? असा मोठा प्रश्न आदिवासी मजुरांना पडला आहे. एका बाजूला बंद पडत असलेला रोजगार आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक चणचण अशा दुहेरी कात्रीत येथील मजूरवर्ग सापडला आहे. यावर प्रशासनाकडून योग्य पावले उचलण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.
करोना आजार येण्यापूर्वी जव्हारला पावसाळ्यात हजारो पर्यटक येत होते. या दिवसात वर्षभरातला जास्तीतजास्त हॉटेल व्यवसाय होत होता. परंतु गेल्या वर्षभरापासून पर्यटनला बंदी असल्याने पर्यटकांनी जव्हारकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. होटेलमध्ये काम करणाऱ्या शेकडो मजुरांना रोजगार मिळत होता, तेही बेरोजगार झाले आहेत. तरी प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून काहीतरी उपाययोजना करावी. – मालती भोये, हॉटेल व्यवसायिक