पालघर : करोनाकाळात जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या वेगवेगळय़ा महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेता प्रत्येक विभागातील तीन महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
जागतिक आरोग्य दिन तसेच आशा दिनाचे औचित्य साधून आशा सेविका, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, सहसेविका, शिपाई, सफाई कामगार, अर्धवेळ स्त्री परिचारिका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा कर्मचारी, वैज्ञानिक अधिकारी यांचे तालुकास्तरावर प्रस्ताव मागवून प्रत्येक विभागातील तीन महिला कर्मचाऱ्यांचासन्मान करण्यात आला.
या प्रसंगी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांचा तसेच भाताणे प्राथमिक आरोग्य केंद्र कायाकल्प योजनेत विशेष कामगिरी बजावणाऱ्या डॉ. सुषमा मुळीक यांचासुद्धा विशेष गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.