जिल्ह्य़ातील तीन लाख लाभार्थीचे अर्धवट लसीकरण; प्रशासनासमोर आव्हान
पालघर : पालघर जिल्ह्यत आतापर्यंत ३३ लाख ८८ हजार नागरिकांची लसीकरण पूर्ण झाले असले तरी यात पहिली मात्रा घेऊन ८४ दिवसांचा कालावधी उलटलेले जिल्ह्यतील सुमारे तीन लाख नागरिक लसीकरणापासून अद्याप दूर आहेत. यामध्ये जिल्ह्यतील ग्रामीण भागात लसीकरणाची टक्केवारी खूप कमी असल्याने जिल्हा प्रशासनासमोर लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
जिल्ह्यत असणाऱ्या २५.४७ लाख लसीकरणाला पात्र लोकसंख्येच्या समोर २०.७५ लाख (८१ टक्के) नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. १३.१३ लाख (५२ टक्के) नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. अजूनही सुमारे पावणेपाच लाख नागरिकांना लशीची पहिली मात्रा देणे शिल्लक असून तलासरी तालुक्यात ३२ टक्के तर डहाणू व मोखाडा तालुक्यात प्रत्येकी ६३ टक्के नागरिकांचे लसीकरणातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. याचबरोबरीने लशीची दुसरी मात्रा घेणाऱ्या पात्र नागरिकांपैकी तीन लाख नागरिकांनी कालावधी उलटूनही अजूनही लशीची दुसरी मात्रा घेतलेली नाही. असे नागरिक शोधून त्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.
१८ ते ४४ वयोगटातील ८६ टक्के नागरिकांचे लसीकरणाची पहिली मात्रा तर ५१ टक्के नागरिकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. ४५ ते ५९ वयोगटातील ७४ टक्के नागरिकांचे लसीकरणाची पहिली मात्रा तर ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असून अवघ्या ५६ टक्के नागरिकांची लशीची पहिली मात्रा तर ३८ टक्के नागरिकांची लसीकरण पूर्ण झाल्याचे दिसून येते. लसीकरण वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन ठिकठिकाणी लसीकरणाची शिबिरे आयोजित करीत असून लसीचा जिल्ह्यत मुबलक साठा उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तीन लाख अतिरिक्त लसीकरण
पहिली लस मात्रा घेतल्यानंतर ८४ दिवसानंतर पात्र असणाऱ्या शहरी भागातील नागरिकांच्या संख्येपेक्षा सुमारे तीन लाख अधिक नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा जिल्ह्यत घेतल्याचे दिसून आले आहे. अशा नागरिकांनी आपले पहिले लसीकरण मुंबई, ठाणे, गुजरात किंवा इतरत्र केल्याचे दिसून आले आहे. लसीकरणाच्या पोर्टलवर सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर होणाऱ्या लसीकरणाची काही प्रसंगी नोंदी होत नसल्याचे निदर्शनास आले असून केंद्र सरकार असे प्रकार कालांतराने समेट (रीकन्साईल) करीत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे प्रत्यक्ष झालेल्या व पोर्टलवर दर्शवित असणाऱ्या आकडेवारीत काही प्रमाणात तफावत असल्याचे सांगण्यात येते.
लसीकरण पूर्ण न करताच प्रमाणपत्र
लसीकरणाचा दुसरी मात्रा प्राप्त करण्यासाठी जाणाऱ्या काही नागरिकांना आपले लसीकरण पूर्ण झाल्याचे केंद्रावर गेल्यावर निदर्शनास येत आहे. पालघर जिल्ह्यत अशी दररोज किमान १० ते १५ प्रकरण पुढे येत असून अजूनपर्यंत ७०० ते ८०० नागरिकांना अशा प्रकारामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यापैकी अधिकतर नागरिकांनी आपली पहिली लस मात्रा परराज्यात घेतल्याचे दिसून येत असून चुकीचे मोबाइल क्रमांक नोंदवले गेल्यामुळे ही समस्या निर्माण होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. बोईसर येथे एका मृत महिलेला लसीकरण केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आवश्यक सुधारणा करून त्यांच्या दोन नातेवाईकांचे नंतर लसीकरण पूर्ण केले.