कासा : कासा परिसरातील १० ते १५ गावांसाठी येथे एकमेव आधार कार्ड केंद्र आहे. त्यामुळे नागरिकांना तिष्ठत राहावे लागते. गर्दी वाढल्याने दिवसभर रांगेत उभे राहूनही आधारकार्डसाठी नोंदणी होत नाही. त्यामुळे नागरिकांना आल्या पावली पुन्हा माघारी जाण्याची वेळ येते.
बँक खाते, नवीन गॅस जोडणी, शालेय विद्यार्थी नोंदणी, रोजगार हमी योजना अशा विविध कामांसाठी तसेच घरकुल, शेतकरी अनुदान अशांसाठी आधार कार्ड असणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे नागरिक ऊन-पावसाची तमा न बाळगता नागरिक आधारकार्ड काढण्यासाठी धावपळ करत आहेत. कासा येथे एकच आधार नोंदणी केंद्र असल्याने कासा परिसरातील चारोटी, सायवन, तलवडा, तवा, घोळ, धामणी अशा १५ ते २० गावांतील शेकडो नागरिक कासा येथील आधार नोंदणी केंद्रावर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. आधार नोंदणीसाठी आपला नंबर लागावा म्हणून नागरिक सकाळी ७ वाजल्यापासून रांगा लावून उभे असतात. १०० ते २०० रु प्रवास खर्च करूनसुद्धा गर्दी असल्याने नागरिकांना बऱ्याचदा माघारी जावे लागते. तरी अशा प्रकारे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागू नये म्हणून आधार नोंदणी केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.