मार्गदर्शक सूचना तसेच दिशादर्शक फलकांचा अभाव; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
कासा : मोखाडा-त्र्यंबकेश्वरमधील ३० किलोमीटरचा तोरंगण (गोंदा) घाट जेवढा निसर्गरम्य, मनमोहक आहे तेवढाच जीवघेणाही ठरू लागला आहे. या घाटातील वळणावळणावर मृत्यूचे सापळे निर्माण झाले आहेत. गेल्या तीन वर्षांत ४०० हून अधिक अपघात झाल्याची नोंद आहे. कोणत्याही मार्गदर्शक सूचना तसेच दिशादर्शक फलक नसल्यामुळे हे अपघात होत असल्याचे कारण सांगितले जात असून त्याकडे सार्वजनिक बांधकामाचे दुर्लक्ष होत आहे.
तोरंगण घाटातून एमआयडीसी नाशिक ते तारापूर, नाशिक ते पालघर, डहाणू अशा मालवाहतुकीसह भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. गुजरातहून त्र्यंबकेश्वर-शिर्डी जाणाऱ्या भाविकांनाही याच रस्त्याचा मोठा आधार आहे. या घाटात मोठय़ा प्रमाणावर वळण आणि चढ-उताराचा रस्ता आहे. अगदी साध्या साध्या वळणावर चढ-उतारावर अनेक अपघात होत असतात. राज्यमार्ग आणि तालुक्यांना जोडणाऱ्या या रस्त्यांवर कसलेही सूचना फलक, दिशादर्शक फलक नसल्याचे दिसून येतात. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. प्रवाशांच्या संरक्षणासाठी मोठय़ा उपाययोजना करणे गरजेचे असून २०१७ साली तर तब्बल बस घाटात जाऊन १५ प्रवासी जखमी होते, तर एक बोअिरगची गाडी पलटी होऊन आठ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघात कमी करण्यासाठी मोठय़ा नामफलकांबरोबरच कायमस्वरूपी उपाययोजनांचीही गरज या ठिकाणी आहे.
आठवडय़ातून किमान दोन अपघात
मोखाडा ते त्र्यंबकेश्वर हा ३० किमीचा आणि मोखाडा ते खोडाळा २० किमी अंतराचे हे दोन्ही रस्ते संपूर्ण घाट रस्ते आहेत. अनेक तीव्र उतार वळणे तसेच खोल दरी आहे. पावसाळय़ात दरडीही कोसळण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर होत असतात. मोखाडा त्र्यंबक घाटात आठवडय़ातून किमान दोन तरी मोठय़ा अपघातांच्या घटना घडतातच मात्र अशा परिस्थितीत या सर्व रस्त्यांवर वाहनचालकांना सावध करणारा एकही सूचना फलक नसल्याने आश्चऱ्य़ व्यक्त होत आहे. यामुळे जव्हार बांधकाम विभागातील हे रस्ते सध्या फलकमुक्त योजना तर राबवीत नाहीत ना असा प्रश्न उपरोधिकपणे विचारला जात आहे.
