निखिल मेस्त्री

पालघर: पालघर जिल्ह्याच्या क्रीडा संकुलाने विकासाच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. संकुलाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा यासाठी  क्रीडा क्षेत्रात अनुभव असलेल्या संस्थांची मदत घेतली जाणार असून, त्यासाठी सल्लागार नियुक्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.  संकुलासाठी राज्य शासनाकडून २५ कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पालघर शहरातील दांडेकर महाविद्यालय रस्तास्थित  संकुलाची सोळा एकर जमीन आहे. मोठे संकुल असूनही विविध क्रीडा प्रकाराच्या खेळपट्टय़ांची कमतरता जाणवत होती. हे लक्षात घेत अलीकडेच  पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी गोविंद बोडके व क्रीडा समितीने संकुलाचा विकास करण्याचा निर्णय घेतला.   त्यानुसार विकासात्मक परिपूर्ण आराखडय़ासाठी  महिन्याभरापूर्वीच सल्लागार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये संकुल विकास करणाऱ्या संस्थांनी सहभाग घेतल्यानंतर तांत्रिक तपासणी करून सल्लागार नियुक्त केला जाणार आहे.

संकुल विकासासाठी पालकमंत्री अध्यक्ष असलेली एक समिती कार्यान्वित आहे. यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा समितीतील प्रतिनिधींचा समावेश आहे. सल्लागार नेमणुक व विकास आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी मंजूर  २५ कोटी रकमेपैकी दोन कोटींची रक्कम जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. संकुलाच्या विकासासाठी तांत्रिक सल्लागाराची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याचे कार्यकारी अभियंता सचिन पाटील यांनी म्हटले आहे.  जिल्ह्य़ातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होण्यास हे क्रीडा संकुल लाभदायक ठरणार आहे. 

विकास आराखडय़ात काय?

  • अंतर्गत आणि मैदानावरील क्रीडा प्रकारासाठी आधुनिक खेळपट्टय़ा.
  • संकुलामध्ये क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने
  • प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह
  • उच्च दर्जाची ४०० मीटरची सिंथेटिक धावपट्टी
  • क्रीडा संकुलाच्या बाह्य मैदानावर नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक
  • अधिकारी क्रीडा मंडळ (क्लब)
  • विविध क्रीडा प्रकारांसाठी  क्रीडा प्रशिक्षक

संकुलात बॉव्सिंग रिंग

खेलो इंडिया अंतर्गत पालघर जिल्ह्यासाठी आधुनिक पद्धतीचे बॉव्सिंग रिंग बसवण्यात आलेली आहे. अलीकडेच या खेळपट्टीचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. सध्या संकुलात व्हॉलीबॉल, हॅन्डबॉल, खोखो, कबड्डी, अथेलेटिक्स खेळ खेळले जातात.

क्रीडा संकुलाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिक खेळाडू घडवण्याचा मुख्य उद्देश आहे. उत्कृष्ट व दर्जेदार खेळाडू हे संकुल घडवेल असा आत्मविश्वासही आहे. संकुलासाठी सर्वाचेच प्रयत्न महत्त्वाचे आहेत.

– सुहास व्हनमाने, जिल्हा क्रीडा अधिकारी, पालघर