चिंचणी ग्रामपंचायतीच्या पुरुष-महिला सदस्यांमधील वादामुळे परस्परांविरोधात गुन्हे दाखल
पालघर : चिंचणी ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणी पदाधिकारी-सदस्य यांच्या वादामध्ये ग्रामविकास खुंटत असल्याचे आरोप आता नागरिक करू लागले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून सरपंच सदस्य असे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यातच सोमवारी महिला व पुरुष सदस्य यांचा वाद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.
महिला सदस्यांना अपमानकारक भाषा वापरल्यावरून सोमवारी सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. एकमेकांमधील वाद वाढत गेल्यानंतर हा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. वाणगाव पोलीस ठाण्यामध्ये पुरुष सदस्य व महिला सदस्यांनी परस्परांविरोधात तक्रार नोंद केल्यानंतर त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची (एनसी) नोंद करण्यात आली. त्यामुळे हे सदस्य वर्ग आपसांत वाद-विवाद करत असल्याने गावाचा विकास बाजूला राहत असल्याच्या अनेक चर्चा चिंचणी गावात रंगत आहेत. याआधी सदस्य विरुद्ध सरपंच असा वाद रंगला होता. सरपंच यांच्याविरोधात थेट अविश्वासाचा ठराव १३ ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार यांच्याकडे दाखल केला होता. मात्र यातील काही सदस्य निर्णयाच्या दिवशी तहसीलदार कार्यालयात हजर न राहिल्याने सरपंच अविश्वास ठरवातून बालबाल बचावले होते. त्यानंतर आता हा दुसरा वाद उफाळून आल्याने वादावादीतच सदस्यांचा वेळ निघून जात आहे व गावाच्या विकासाकडे लक्ष द्यायला सदस्यांना वेळ नसल्याचे आरोप नागरिक करीत आहेत.
चिंचणी गावांमध्ये सदस्य वर्गामध्ये राजकारणावरून अनेकदा खडाजंगी झालेल्या आहेत. आरोप-प्रत्यारोप यामुळे सदस्यवर्ग स्वत:वरील आरोप खोटे असल्याचे सिद्ध करण्यासाठी वेळ खर्ची घालत आहे. यानंतर ज्याने आरोप केला आहे, त्याच्यावर प्रत्यारोप करून दुसरा सदस्य त्याचाही वेळ वाया घालवत आहे. एकमेकांवर डाव ठेवून असा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून राजकारणाच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र या राजकारणामध्ये नागरिकांचा विकास दूरच राहिलेला आहे. गावातील विविध विकासकामे मार्गी लावण्याकडे या सदस्य वर्गाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
चिंचणी ग्रामपंचायत विविध प्रभागांतून १८ सदस्य नागरिकांनी त्यांच्या विकासासाठी निवडून दिले आहे. सुरूवातीच्या काळामध्ये विकासकामे झाली असली तरी त्यानंतर अलीकडच्या काळात सरपंच विरुद्ध सदस्य, सदस्य विरुद्ध सदस्य असे सूडबुद्धीचे राजकारण तापले होते. त्यामुळे विकासकामे मंजुरीविना पडून असल्याचे म्हटले जात आहे. अनेक प्रभागांतील विकासकामे आजही प्रलंबित आहेत. भविष्यात ही विकासकामे होतील की नाही असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.
सरपंच व नागरिक प्रतिक्रिया स्वतंत्र पाठवत आहे. वादविवाद मिटावा व ग्रामविकासाची कामे व्हावीत या दृष्टीने येत्या शुक्रवारी ग्रामसभा आयोजित केलेली आहे. नागरिकांच्या समस्या व सद्स्यांचे वाद त्यावेळी सुटतील अशी अपेक्षा आहे.
– कल्पेश धोडी, सरपंच, चिंचणी
चिंचणी गावाला सुसंस्कृत व थोरांचा वारसा आहे. मात्र चिंचणी गावच्या नागरिकांनी मोठय़ा विश्वासाने निवडून दिलेले आताचे स्थानिक नेतृत्व हे सपशेल अपयशी ठरले आहे. गावच्या विकासासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक होते. परंतु त्यांचे वाद आता पोलीसदरबारी गेला याचे दु:ख होत आहे.
– विजय चुरी, माजी ग्रामपंचायत सदस्य