कासा : पालघर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम आणि मागासलेला म्हणून ओळख असलेल्या जव्हार तालुक्यातील डॉ. अजय डोके यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले. त्यांच्या या यशामुळे जव्हार तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होऊन अभिनंदन केले जात आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातून प्रथमच डॉ. अजय डोके यांच्या रूपाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या इतर तरुणांच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही देशातील सर्वोच्च कठीण्य पातळी असलेली परीक्षा आहे. या परीक्षेत यश मिळविण्यासाठी अनेक विद्यार्थी घर सोडून शहरी भागात येऊन महागड्या शिकवण्या (क्लासेस) लावतात. वर्षानुवर्षे अभ्यास करतात तरीसुद्धा या परीक्षेत यश मिळवून अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न स्वप्नच राहते. परंतू डॉ.अजय डोके यांनी जव्हार तालुक्यातील कोगदे या दुर्गम गावातील घरून परीक्षेची सर्व तयारी करीत यश मिळविता हे दाखवून दिले. डॉ. अजय डोके यांचे प्राथमिक शिक्षण सुद्धा त्यांचे गाव कोगदे येथिल जिल्हा परिषदेच्या शाळेतच झाले होते. त्यांचे पुढील शालेय शिक्षण नाशिक जवळील ब्रम्हा व्हॅली येथे झाले. डॉ. अजय डोके यांना सुरवातीपासूनच अभ्यासाची आवड असल्याने ते कायमच वर्गात प्रथम क्रमांकावर राहायचे. १२ विज्ञान शाखेत त्यांनी घवघवीत यश मिळवले तसेच वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश परीक्षेतही यश मिळवीत त्यांनी के.ई. एम. या नामांकित वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केले.

एमबीबीएस शिक्षणाची आंतरवासिता सुरू असतानाच त्यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला व परीक्षा दिली. त्यांनी कुठल्याही प्रकारच्या खाजगी महागड्या शिकवण्या (क्लासेस) न लावता घरीच राहून ऑनलाइन च्या माध्यमातून अभ्यास सुरू ठेवला. अशा पध्दतीने अभ्यास करत त्यांनी अतिशय कठीण असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत देशातून ३६४ वी रँक मिळवली. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण पालघर जिल्ह्यातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात असून शालेय विद्यार्थ्यांसाठी ते एक आदर्श म्हणून पुढे आले आहेत.

मी यूपीएससी चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इतकेच सांगू इच्छितो की कोणत्याही प्रकारचे महागडे क्लासेस न लावताही इंटरनेट च्या माध्यमातून मन लावून आणि एकाग्रतेने अभ्यास केला तर तुम्ही यश मिळवू शकता. – डॉ. अजय डोके