पालघर : केळवे रोड परिसरात सुरू असलेल्या राजकीय प्रकल्पांमुळे या रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शिवाय पूर्व पश्चिम भागाला जोडण्यासाठी शाश्वत व्यवस्था उभारण्यास प्रशासन अपयशी ठरल्याने किमान सहा ते सात हजार नागरिकांना खड्डेमय रस्ते व चिखलातून मार्गक्रमण करावे लागत आहे. येथील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे अनेकदा याबाबत पाठपुरावा केला असला तरीही त्यावर यशस्वी तोडगा निघालेला नाही.
समर्पित रेल्वे मालवाहू मार्ग डीएफसीसीचे काम गेल्यावर्षी संपले असले तरी या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आला होता. त्यामुळे केळवे रोड ते कपासे, केळवे रोड ते चौकी पाडा (वाकसई) तसेच केळवे पूर्वेकडे रोठे-कपासे रस्त्याची दयनीय अवस्था झालेली होती. कपासे रेल्वे उड्डाण पुलापासून सुमारे तीन किलोमीटरच्या पट्ट्यात डांबरीकरण व कॉंक्रीटीकरणाचा थर अंथरण्यात आला असला तरीही केळवे रोड स्टेशन पासून रोठे गावापर्यंत असणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
पश्चिम रेल्वेचे चौपदरीकरण तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणी संदर्भात या परिसरात काम वेगाने सुरू असल्याने या मार्गावरून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरु असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी खडी, कपची, मुरूम द्वारे हंगामी दुरुस्ती केली तरी पाऊस पडल्यानंतर परिस्थिती पूर्ववत होत असल्याचे दिसून आले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पावसाळ्यात देखील मुरूम मातीचा भराव करण्याचे काम सुरू असल्याने ही माती रस्त्यावर येऊन रस्ते चिखलमय झाले आहेत.
या संदर्भात परिसरातील नागरिकांनी मार्च २०२५ पूर्वी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली असता पूर्वीच्या रेल्वे फाटक क्रमांक ४४ (रोठे) व रेल्वे फाटक क्रमांक ४५ (वाकसई) येथे दोन उड्डाणपूल मंजूर केले असून त्यांचे प्राथमिक सर्वेक्षण व प्रस्तावित पुलाच्या ठिकाणी माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या दोन्ही पुलाच्या जवळ रेल्वे व्यवस्थापनाने भुयारी मार्ग (अंडरपास) उभारला असला तरी त्यामध्ये शासनाने पावसाचे पाणी व महावितरणचा विद्युत प्रवाह खंडित झाल्यास पाणी उपसण्यासाठी बसवण्यात आलेला विद्युत पंपबंद राहिल्याने गुडघाभर पाणी व चिखलातून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर येथील नागरिकांना त्यांची भेट होऊ शकली नसल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे असून गेल्या काही महिन्यात जिल्हा प्रशासनाशी झालेल्या चर्चेअंती या प्रश्नाची तीव्रता प्रशासनापर्यंत पोहोचू शकली नसल्याने किमान सहा हजार नागरिकांना दररोज हाल अपेष्ठांना सामोरे जावे लागत आहे.
पाच वर्षांपासून समस्या दुर्लक्षित
वेगवेगळ्या राष्ट्रीय प्रकल्पांसाठी भराव करण्याच्या निमित्ताने अवजड वाहनांची वर्दळ सुरू असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यंदा केळवे रोड कपाशी रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार असताना पावसाचे लवकर आगमन झाल्याने हे काम देखील रखडून पडले आहे. त्यामुळे रोठे, करसोंडा, देवपाडा, माकुणसार पूर्व, प्लॉट वाडी, वळणवाडी या भागातील नागरिकांना खड्डेमय रस्ते व चिखलातून प्रवास करावा लागत आहे. रोठे पूर्व भागात सफाळा अथवा केळवा रोड रेल्वे स्थानकाला जोडणारा समांतर रस्ता उभारण्याबाबत लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने अनेकदा आश्वासन दिले असले तरी या रस्त्याची उभारणी सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतीच्या कामानिमित्त अथवा नोकरीधंदा निमित्त पूर्व पश्चिमेला प्रवास करणारे करसोंडा, मोहाळे, डोंगरीपाडा या भागातील किमान पाच हजार नागरिकांना त्रासदायक परिस्थितीतून मार्गक्रमण करावे लागत आहे.
भुयारी मार्गाची आखणी फसली
या भागात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असे मात्र भुयारी मार्गाच्या उभारणीत असणारी गळती रोखण्यास रेल्वे व्यवस्थापनाला अपयश आल्यानंतर त्या ठिकाणी डिझेलवर चालणारे विद्युत पंप बसवण्यात आले. भुयारी मार्गात शिरणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या तुलनेत पंपाद्वारे पाणी उपसून बाहेर फेकण्याची व्यवस्था अपुरी पडत असल्याने या भागातील दोन्ही भुयारी मार्गात सतत पाणी व चिखल असल्याने शालेय विद्यार्थी, महिला, कामावर जाणारे नागरिक व दुचाकी स्वाराला अशा परिस्थितीतून प्रवास करावा लागतो अन्यथा धोकादायक स्थितीत रेल्वे रूळ ओलांडावे लागतात अशी परिस्थिती आहे. वेगवेगळ्या ठिकाणी साचलेल्या चिखलामध्ये दुचाकी सरकून अपघात होण्याचे देखील प्रकार घडले आहेत. पावसाळ्याच्या हंगामात या भुयारी मार्गांमध्ये सातत्याने पाणी व चिखल जात असल्याने यांची आखणी व त्यावर झालेला खर्च वाया गेल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
या भागात पावसाळ्याच्या हंगामात अनेकदा विद्युत प्रवाह खंडित होत असतो. या पार्श्वभूमीवर भुयारी मार्गात पाणी उपसण्यासाठी बसवण्यात आलेले पंप खूप कमी ठरत असून या पंपांसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या रोहित्रांचा उपयोग आवश्यक वेळी होत नसल्याने केळवे रोड परिसरातील नागरिकांना मोठ्या कठीणाईला सामोरे जावे लागत आहे.
रोठे फाटक क्र. ४४ च्या जागी बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गाच्या समस्या तसेच शाळकरी मुले, वयस्कर, कष्टकरी, स्त्रिया यांना केळवेरोड स्टेशनपर्यंत पोचणे हे केवळ चिखलमय आणि खड्ड्यांच्या रस्त्यातूनच क्रमप्राप्त आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार बैठका संबंधित अधिकाऱ्यांसह होऊनही फलनिष्पत्ती शून्य आहे. मधुसूदन जोशी, रहिवासी केळवे रोड