जिल्हा परिषदेच्या गुजराती शाळेत आठवीपर्यंतचे वर्ग; पुढील शिक्षणाची चिंता

पालघर : पालघर जिल्हा परिषदेतर्फे चालवण्यात येणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या गुजराती माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पुढील माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी पालघर तालुक्यात सुविधा उपलब्ध नसल्याने या शाळेतील १२६ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेचा  फटका या विद्यार्थ्यांना  बसला आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या तालुका शाळेलगत असणाऱ्या गुजराती माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण दिले जाते. सुमारे १२६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील १४ विद्यार्थी यंदा आठवी उतीर्ण झाले आहेत. यातील दोघांनी पर्याय नसल्यामुळे  मराठी आणि हिंदी माध्यमातून पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेश घेऊन त्यांचे शिक्षणही सुरू झाले आहे. इतर १२ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा पेच कायम राहिला आहे.

या शाळेतून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी यापूर्वी आर्यन एज्युकेशन शाळेच्या गुजराती विभागात नववी व दहावीचे शिक्षण घेत असत. पटसंख्येअभावी आर्यन शाळेमधील नववी व दहावीचे गुजराथी माध्यमाचे वर्ग गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेमधून इयत्ता आठवी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना डहाणू तालुक्यातील चिंचणी येथे असलेल्या माध्यमिक शाळेत किंवा तालुक्याबाहेर अध्र्या ठिकाणी पुढील शिक्षण घ्यावे लागत आहे. पालघर येथून चिंचणी येथे शिक्षणासाठी जावयाचे असल्यास किमान सव्वा ते दीड तासाचा अवधी लागत असून प्रवासाच्या दृष्टीने ती खर्चीक बाब आहे.  त्यामुळे सर्वसामान्य गुजराती कुटुंबीयांना ती न  परवडण्यासारखी आहे.

सन २०२० मध्ये आठवी उत्तीर्ण झालेल्या आठ विद्यार्थ्यांंवर ज्या प्रमाणे शिक्षणाच्या प्रवाहातून दूर राहण्याची वेळ ओढवली त्याच पद्धतीने उर्वरित बारा विद्यार्थ्यांंचे  शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. शिक्षण विभागाने पालघर येथील अनुदानित शाळेला गुजराती माध्यमाचे नववी व दहावीचे वर्ग बंद करण्याची अनुमती दिली, त्यावेळी जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या ११२ विद्यार्थ्यांंची पुढील शिक्षणाची व्यवस्था करणे अपेक्षित होते. यंदा उत्तीर्ण झालेल्या १२ विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून त्याचपद्धतीने यंदा आठवी इयत्तेत शिकणाऱ्या २० विद्यार्थ्यांनाही चिंतेने ग्रासले आहे.

दरम्यान, पालघर तालुक्यात अनेक गुजराती भाषिक उच्च मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीय कुटुंबीय आहेत. आर्थिकदृष्टय़ा ते सक्षम असल्यामुळे  त्यांना आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेणे शक्य आहे. परंतु आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय पर्याय नाही. तर दुसरीकडे या शाळेत पटसंख्या मर्यादित राहिल्याने  कमी पटसंख्येच्या शाळा सुरू ठेवणे प्रशासनाला आव्हानात्मक ठरत आहे.

प्रशासन, लोकप्रतिनिधीची उदासीनता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी माध्यमाच्या आठवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंचा काही वर्षांंपूर्वी प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर जिल्हा परिषदेने अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यासाठी विशेष परवानगी मिळवली होती.  त्यानुसार वर्गही सुरू झाले. याच धर्तीवर पालघर जिल्हा परिषदेच्या गुजराती माध्यमाच्या शाळेत दहावीपर्यंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक होते. परंतु त्यांच्या उदासीनतेमुळे गुजराती विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आले आहे.