पालघर: वाडा तालुक्यातील पीक हातोबा देवस्थान पुन्हा एकदा दर्जाहीन कामाच्या फेऱ्यात अडकले आहे. सार्वजनिक बांधकाम खाते लक्ष देत नसल्याने येथे चालू असलेल्या बांधकामांत अक्षरश: वाट्टेल ते फेरफार केले जात आहेत. संरक्षक भिंतीच्या बांधकामात काँक्रीटऐवजी दगड वापरला
जात आहे. शिवाय त्यात उभारणी अनावश्यक ठिकाणी होत आहे. निकृष्ट कामासह शासकीय निधीचाही यामुळे चुराडा होत आहे.
विकासकाम हे सोयीस्कर नाव वापरून हातोबा देवस्थान परिसरात बोगस कामे सर्रास सुरू आहेत. दोन वर्षांत सुमारे १ कोटीच्या विकास निधीचा चुराडा केल्याचा आरोप होत आहे. नुकताच १० लाखांचा खर्च करून बांधण्यात येत असलेल्या संरक्षक भिंतीचे काम दर्जाहीन झाल्याची तक्रार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचा अंकुश नसल्याने ठेकेदार मोकाट आहे. दर्जाहीन कामाला स्थगिती देऊन हे काम पुन्हा नव्याने करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
संरक्षण भिंतीच्या कामामध्ये सिमेंट काँक्रीट वापरून ती उभारणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र काँक्रीटऐवजी दगड टाकून त्यावर काँक्रीटचा नाममात्र मुलामा दिला जात आहे आणि काँक्रीटीकरण केल्याचा देखावा उभा केला जात आहे.
काम सुरू करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखरेख करणे आवश्यक होते. अंदाजपत्रकानुसार काम करणे, वारंवार कामाची पाहणी करणे, कामाचा दर्जा तपासणे आणि त्याबद्दल अहवाल कार्यालयाला कळवणे अपेक्षित होते. मात्र तशा प्रकारची नोंद कुठेही झालेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांचेच आर्थिक हितसंबंध गुंतल्यामुळे ठेकेदाराला रान मोकळे मिळाले असल्याची चर्चा आहे. याआधीसुद्धा सार्वजनिक बांधकाम खाते अनेक गैरव्यवहार प्रकरणांमुळे गोत्यात आलेले असताना आता या दर्जाहीन कामामुळे पुन्हा त्याची चर्चा होत आहे. बेजबाबदार ठेकेदार आणि कामावर देखरेख ठेवणारे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कनिष्ठ अभियंता यांच्यावर नियमानुसार कारवाई होण्याची मागणी होते आहे.
प्रशासनाकडून कामाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली जाणार आहे. त्यामध्ये तफावत आढळल्यास तातडीने ते काम थांबवण्यात येईल, तसेच दर्जाहीन काम नष्ट करण्यात येईल आणि अंदाजपत्रकानुसारच नव्याने काम सुरू होईल.-धीरज गणवीर, कनिष्ठ अभियंता, विक्रमगड, सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार