वाडा: रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या चार महिन्यांत केव्हाही होण्याची शक्यता आहे. या संभाव्य निवडणुकांमुळे आचारसंहिता केव्हाही जारी होऊ शकते. ही आचारसंहिता लागू झाली तर पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या, सेवाज्येष्ठता रखडण्याची भीती या कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
पालघर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या साडेतीनशेपेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ामुळे गेले वर्षभर रखडल्या आहेत. ओबीसी आरक्षण निर्णय न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे. यामुळे येत्या चार महिन्यांत कधीही निवडणूक आयोग या रखडलेल्या निवडणुका घोषित करण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात विविध ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू होणार आहे. एकटय़ा वाडा तालुक्यात ६९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका रखडलेल्या आहेत.
या आचारसंहितेमुळे शिक्षकांच्या होऊ घातलेल्या बदल्यांना स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या सुचनेनुसार सर्व तालुक्यांतून शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेनुसार याद्या तयार करण्यात आल्या असून जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आल्या आहेत. पदवीधर व मुख्याध्यापक यांच्या गुणवत्तेवर याद्या तयार करून, त्या याद्यांवरून शिक्षकांचे समुपदेशन घेण्यात आले आहे. विस्तार अधिकारी पदांची यादी रिक्तपदानुसार तयार करण्यात आली आहे. मात्र महिना होऊनही प्रत्यक्ष पदावर हजर होण्याबाबतचे आदेश दिलेले नाहीत. शिक्षकांबरोबरच जिल्हा परिषदेच्या अन्य प्रशासन विभागातील शेकडो कर्मचारी अन्य जिल्ह्यांत बदली करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र या जिल्ह्यातील रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो. त्यासाठीच्या आचारसंहितेमुळे शिक्षक, कर्मचारी यांच्या बदल्या तसेच सेवाज्येष्ठतासुद्धा अडकून राहू शकतात. गेल्या तीन वर्षांपासून बदल्या झालेल्या नसल्याने आधीच कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे, त्यातच आता आचारसंहितेच्या भीतीने कर्मचारीवर्ग ग्रासला आहे.

जूनमध्ये निवडणुका जाहीर होणार का ?
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन आठवडय़ांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश सर्व राज्यांना मिळाले आहेत. त्याप्रमाणे या निवडणुका जूनमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. याविषयी वाडा तालुक्यातील पीक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रवींद्र जोगवळा म्हणतात, गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती असल्याने विकास खुंटला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर करून जनतेला निवडणूक आयोगाने दिलासा द्यावा.

संभाव्य निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रशासनाने बदल्या व सेवाज्येष्ठतांचे आदेश तातडीने काढावेत. – मनेश पाटील, जिल्हाध्यक्ष, शिक्षक सेना, पालघर जिल्हा.