नांदगाव येथील वन खात्याच्या दोनशे एकरच्या भूखंडावर व्यापारी गाळे
डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मोक्याच्या जमिनी गिळंकृत करण्यासाठी भूमाफियांनी आदिवासी नवीन शर्तीच्या जमिनींबरोबर वन जमिनींवर अतिक्रमण केल्याचे प्रकार उघड होत आहेत. नांदगाव येथे सव्र्हे नं. ७१ या वन खात्याच्या २०० एकर भूखंडावर भूमाफियांनी व्यापारी गाळे तसेच धाबे बांधले आहेत. मात्र, वन विभागाकडून कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस अतिक्रमण वाढू लागले आहेत. याबाबत मनोर वन परिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर यांना विचारले असता वन विभागाच्या भूमापकांकडून सव्र्हे नं. ७१ ची मोजणी करून अतिक्रमण दूर करणार असल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
मुंबई-अहमदाबाद महामार्गानजीक विरार, खानीवडा, वरई, हालोली, बोट, मस्तान, दुर्वेस, नांदगाव, वाडा खडकोना, मेंढवण, सोमटा, चारोटी, कासा, धुंदलवाडी, आंबोली तसेच आच्छाडपर्यंत मोक्याच्या जागी आदिवासी मालकी तसेच वन विभागाच्या जमिनी आहेत. आदिवासी मोक्याच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करून हॉटेल धाबे मालकांकडून जमिनी गिळंकृत करून धाबे बांधण्यात आले आहेत. आदिवासी जागेनंतर आता भूमाफियांनी थेट वन जमिनीच्या जागांवर अतिक्रमण करून धाबे तसेच व्यापारी गाळे बांधले आहेत. वन अधिकाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनात आणूनदेखील त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गानजीक नांदगाव येथे सव्र्हे नं. ७१ या वन विभागाच्या जागेवर वन कर्मचारी आदिवासींच्या घरांवर कारवाई करतात. मात्र अनधिकृत धाबे आणि गाळे यांच्यावर कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. नांदगाव येथे सव्र्हे नं. १३/अ या गंगी मोर यांच्या जागेत बिगर आदिवासी व्यक्तीने परस्पर माती भराव करून अतिक्रमण केल्याबाबत पालघर तहसीलदार यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. तर अनेक भागांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हद्दीत अतिक्रमण करण्यात आले आहे.
नांदगाव येथील अतिक्रमणाचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे.
– एस. कचरे, तलाठी, नांदगाव
वन विभागचे भूमापकांकडून सव्र्हे नं. ७१ ची मोजणी करून अतिक्रमण दूर करण्यात येईल.
– तुषार काळभोर, वन परिक्षेत्र अधिकारी, मनोर