यंत्रणेत बिघाड होण्याचा वाहनचालकांसह प्रवाशांना फटका
कासा : देशभरात ‘फास्टॅग’ वापरणे सर्वच वाहनधारकांना बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही टोलनाक्यावर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. फास्टॅग स्टिकर स्कॅन न होणे, तो न झाल्यास त्यासाठी टोलची दुप्पट रक्कम भरण्यावरून होणारे वाद त्यास कारणीभूत ठरत आहेत. याच कारणावरून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोलनाक्यावर गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेवर गुरुवारी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
फास्टॅगद्वारे टोलनाक्यांवरील रांगांमधून लवकर मुक्ती मिळेल, असा सरकारने दावा केला होता. परंतु वाहनावर फास्टॅग असूनही टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या १ ते २ किलोमीटरवर रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले. चारोटी टोलनाक्यावर फास्टॅग स्टिकर स्कॅन न झाल्याने टोल कर्मचारी टोलची दुप्पट रक्कम भरायला सांगतात त्यामुळे वाहनधारक आणि टोल कर्मचारी यांच्यामध्ये वाद होत आहेत. बऱ्याचदा फास्टॅग स्टिकर स्कॅन न झाल्याने रोखीने टोल भरल्यानंतर काही वेळाने टोलची रक्कम फास्टॅगमधून वसूल केल्याचाही संदेश वाहनधारकांना येत आहे. त्यामुळे दुप्पट टोल आणि पुन्हा फास्टॅगमधूनही टोल वसुली असा असा भुर्दंड वाहनधारकांना सोसावा लागत आहे. त्यातच टोलनाक्यावर झालेल्या कोंडीतून सुटका करण्यासाठी अनेक वाहनचालक आपली वाहने विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवरून चालवत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
नियमांकडे दुर्लक्ष
टोलनाक्यावर वाहनांची गर्दी वाढल्यास टोल बंद करून वाहनांना सोडून देण्यात यावे व गर्दी कमी करावी असा नियम असतानाही आयआरबी कंपनी या नियमांचे कधीही पालन करताना दिसत नाही. या समस्यांवर आयआरबी कंपनीने तोडगा काढून होणारी गर्दी टाळावी व वाहनचालकांना होणारा मनस्ताप दूर करावा अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. सदर होणाऱ्या वाहनाच्या गर्दीवर काय तोडगा काढता येईल, याविषयी आयआरबी कंपनी प्रशासनाला विचारल्यावर त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.