करोनाच्या कडक र्निबधामुळे भाविकांची संख्या रोडावल्याचा फटका
कासा : गेल्या १५ ते १६ महिन्यांपासून करोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध घातले आहेत. याचा आर्थिक फटका डहाणू तालुक्यातील विवळवेढे येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात असणाऱ्या लहानमोठय़ा व्यावसायिकांना बसत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याने, मंदिर परिसरात असलेले छोटे-मोठे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी गुजरात, मुंबई, नाशिक तसेच पालघर जिल्ह्यातील हजारो भाविक दररोज येत होते. सुट्टीच्या दिवशी भाविकांची संख्या मोठय़ा प्रमाणात राहात होती. याच भाविकांवर मंदिर परिसरात असणारे छोटे-मोठे व्यावसायिक अवलंबून असतात. महालक्ष्मी मंदिर परिसरात पूजा साहित्य, प्रसाद, खेळणी, कटलरी, छोटी हॉटेल चालवणारे ३५ ते ४० व्यावसायिक आहेत. तसेच स्थानिक महिला पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या रानभाज्या विक्रीसाठी आणत होत्या.
या भाज्या शहरातून येणाऱ्या भाविकांकडून आवडीने खरेदी केल्या जात होत्या. यामधून या सर्व व्यावसायिकांना उपजीविकेचे साधन मिळत होते. परंतु मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली आहे. त्याचा आर्थिक फटका या सर्व व्यावसायिकांना बसला आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात करोना नियमांच्या अधीन राहून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या हळूहळू वाढू लागली होती. त्यामुळे या व्यावसायिकांना थोडाफार धीर आला होता. परंतु पुन्हा दुसरी लाट आल्यामुळे मंदिर बंद करण्यात आले. त्यामुळे या व्यावसायिकांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक व्यावसायिकपुढे बिल भरणे, दुकानाचे भाडे कसे द्यायचे, असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. करोना नियमांचे पालन करून मंदिर दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी येथील व्यावसायिक करत आहेत.
दोन वेळा यात्रा रद्द
महालक्ष्मीची यात्रा चैत्र पौर्णिमेपासून सुरू होऊन पुढे पंधरा दिवस चालते. या यात्रेच्या कालावधीमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. यामधून मंदिर परिसरातील व्यावसायिकांना मोठय़ा प्रमाणात उत्पन्न मिळते. परंतु करोना महामारीमुळे सलग दोन यात्रा रद्द झाल्या. त्यामुळे याचाही मोठय़ा प्रमाणात फटका या व्यावसायिकांना बसला आहे.
मंदिर बंद असल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली आहे. त्यात येणारे भाविक मंदिराच्या कळसाचे दुरूनच दर्शन घेऊन निघून जातात. त्यामुळे आमच्या व्यवसायांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. तरी शासनाने काही प्रमाणात नियम शिथिल करत मंदिर दर्शनासाठी खुले करावे. त्यामुळे आमच्यासारख्या व्यावसायिकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होईल.
– प्रकाश सातवी, स्थानिक व्यावसायिक