पालघर : ६१ दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी आज संपत असून मध्यरात्रीपासून मासेमारी करण्याची अनुमती मत्स्य व्यवसाय विभागाने दिली आहे. या दृष्टीने पालघर जिल्ह्यातील १८११ मासेमारी बोटी समुद्रात जाण्यासाठी सज्ज झाल्या असून पुढील १२-१५ दिवस समुद्र शांत व स्थिर असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने मच्छीमारांमध्ये उत्साहाचे उधाण आले आहे.
पालघर जिल्ह्यात बिगर यांत्रिकी ३३ बोटी असून एक सिलेंडरच्या १७१, दोन सिलेंडरच्या ३८६, तीन सिलेंडरच्या १०६, चार सिलेंडरच्या ४०४ व सहा सिलेंडरच्या ७११ बोटींनी मासेमारी करिता मत्स्य व्यवसाय विभागाकडून परवानगी घेतली आहे. यामध्ये अर्नाळा बंदरातील सुमारे २५०, वसई परिसरातील २२५, सातपाटी येथील १९०, धाकटी डहाणू येथील १५०, मुरबे येथील ३५ मासेमारी बोटींचा समावेश आहे.
१ जून ते ३१ जुलै दरम्यान मासेमारी बोटींची देखभाल दुरुस्ती केल्यानंतर या बोटीच्या रंग नियमावलीनुसार (कलर कोड) रंगरंगोटी तसेच बोटीचा नंबर कोरण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी या बोटींची पारंपारिक पद्धतीने पूजा करून मासेमारीसाठी तयारी पूर्ण झाल्याची माहिती मच्छीमारांकडून प्राप्त झाली आहे.
या बोटींना १ ऑगस्ट पासून मासेमारी परवाना देण्यात आला असून ३१ मे रोजी बंदिस्त केलेला डिझेल साठा उद्या (ता १) खुला करून बोटीने डिझेल वितरण व्यवस्था उद्यापासून कार्यान्वित करण्यात येत असल्याची माहिती पालघरचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त दिनेश पाटील यांनी लोकसत्ता ला दिली. या परवाना दिलेल्या मासेमारी बोटी संबंधित मच्छिमार सहकारी संस्थांशी संलग्न असून त्यांची नोंदणी या संस्थांमध्ये केली जात आहे.
बोटीवर असणाऱ्या खलाशांनी मत्स्य व्यवसाय विभागाने यापूर्वी दिलेले बायोमेट्रिक कार्ड अथवा क्यूआर कोड असलेले आधार कार्ड ओळखपत्र म्हणून सोबत बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. मासेमारी बोटींची तपासणी करण्यासाठी वसई, एडवण, सातपाटी व डहाणू येथे मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी कार्यरत असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाकडून देण्यात आली.
सातपाटी मुरबा येथील बोटी खाडीत
३१ जुलैच्या मध्यरात्री सातपाटी खाडीमध्ये पाण्याची पातळी बोटी तरंगण्यासाठी पुरेशी नसल्याने बहुतांश बोटीने आज सातपाटी व मुरबे दरम्यानच्या खाडीमध्ये मार्गक्रमण केले आहे. मध्यरात्रीनंतर या बोटी समुद्राकडे प्रयाण करणार असून पुढील दोन आठवडे स्वच्छ वातावरण व समुद्र शांत असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने मासेमारीची पहिली फेरी लाभदायक करावी यासाठी प्रार्थना करीत आहेत.
मासेमारी बोटीना एआयएस बसवणे अनिवार्य
प्रत्येक मासेमारी बोटींची माहिती व सद्यस्थिती (लोकेशन) मत्स्य व्यवसाय विभागाला मिळावी या दृष्टीने दोन सिलेंडरपेक्षा अधिक क्षमतेच्या प्रत्येक मासेमारी बोटीला स्वयंचलित माहिती प्रणाली अर्थात ऑटोमेटेड इन्फॉर्मेशन सिस्टम नौकेवर बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रणालीतील ट्रान्सपोडर केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून देण्यात येणार असून याद्वारे संकलित होणारी माहिती जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षात उपलब्ध होणार आहे. सुमारे ७० टक्के मासेमारी बोटीनी ही प्रणाली कार्यान्वित केली असून उर्वरित मासेमारी बोटी पुढील काही दिवसात ही प्रणाली कार्यान्वित करतील व नंतरच मासेमारीसाठी जातील असेही पालघरच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.