पालघर: गणपती आगमनाच्या काही दिवस पूर्वी समुद्रात असलेले प्लास्टिक व अन्य कचरा शिरगाव, सातपाटी दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आला होता. शिरगाव ग्रामपंचायतीने स्वयंचलित बीच क्लिनिंग मशीनच्या माध्यमातून दोन दिवसात सुमारे पाच टणांपेक्षा अधिक कचरा गोळा करून भाविकांना विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली.

दरवर्षी पावसाळ्या दरम्यान जिल्ह्यातील विविध किनारपट्टीवर प्लास्टिक उपयुक्त कचरा अथवा डांबर गोळे येत असतात. यंदा शिरगाव व सातपाटी दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा येऊन लागला होता. त्यामुळे निजप हायस्कूल ते दत्त मैदान (माळी आगर) दरम्यान च्या भागात होणारे गणपती विसर्जनाला येणाऱ्या भाविकांना अस्वच्छतेच्या वातावरणात विसर्जन करावे लागेल अशी शक्यता निर्माण झाली होती.

या संदर्भात माळी स्टॉप परिसरातील एका व्यवसायिकाने किनारावर लागलेल्या कचरा दर्शवणारा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित केल्यानंतर ग्रामपंचायतीने त्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून मिळालेल्या स्वयंचलित किनारा सफाई मशीन चा वापर करण्याचे योजिले. २७ व २८ ऑगस्ट रोजी दररोज किमान सात तास या यंत्राद्वारे किनारा सफाई करून किमान पाच टन प्लास्टिक युक्त गोळा केल्याची माहिती ग्रामपंचायत इकडून प्राप्त झाली आहे. शिरगाव स्मशानभूमी ते सातपाटी गावाची हद्द अशा सुमारे दीड- दोन किलोमीटर लांबीच्या व १०० – १२५ फूट रुंदीचा कचरा यांत्रिकी पद्धतीने गोळा करण्यास ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना यश लाभले. यामुळे बकाल दिसणारा शिरगाव चा समुद्र किनाऱ्याला सौंदर्य प्राप्त झाले.

इंधनाच्या खर्चाची तरतूद करावी

सुमारे एक कोटी रुपयांच्या या स्वयंशरीत किनारा सफाई यंत्र वापरण्यासाठी कुशल मनुष्यबळ व इंधनाची आवश्यकता असून दोन दिवसाच्या सफाईसाठी सुमारे पाच हजार रुपयाचे डिझेल लागल्या चा प्राथमिक अंदाज आहे. शिरगाव ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपयांच्या जवळपास असले तरी विकास कामा व दैनंदिन कामात जर विचार करता आठवड्याला इतका खर्च करणे सहजगत शक्य नाही. अशा प्रकारची पाच स्वयंचलित यंत्र जिल्ह्यातील विविध किनारपट्टींच्या गावांना देण्यात आली असून या सर्व ग्रामपंचायतींना इंधनाच्या खर्चाची बाब भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने अथवा सामाजिक दायित्व फंडामधून किनारा सफाईसाठी आर्थिक तरतूद करावी अशी मागणी पुढे येत आहे.

विसर्जनासाठी निशुल्क होडी सेवा

शिरगाव येथील मांगेला येथील काही तरुणांनी गेल्या काही वर्षांपासून गणेश विसर्जनासाठी निशुल्क होडी पुरवली जात आहे. यामुळे पालघर शहर व परिसरातील अनेक गणेश भक्त निजप हायस्कूलच्या मागील भागात विसर्जनासाठी येत असल्याचे दिसून आले. शिरगाव मधील मिनेश धनु, सचिन पागधरे, चेतन धनु, तषार चामरे, मितेश किणी, आशिष मोरे, लोचन तांडेल, विजेंद्र पागधरे, धनराज चामरे, यतिन किणी व इतर बांधवांनी या उपक्रमात सहभाग घेतला.