पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या सदस्य वर्गाच्या परराज्यातील अभ्यास दौऱ्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद असताना २३ ते २५ लाख रुपये खर्चाचे नियोजन केले जात आहे. सदस्य वर्गाला विमानाने नेण्याचा घाट घातला जात असून या दौऱ्यासाठी एकत्रित अभ्यास दौऱ्याचा देखावा करून प्रत्येक विषय समितीकडून तसेच ठेकेदार व इतर माध्यमातून दौऱ्यासाठी पैसे मागितल्याची खात्रीलायक माहिती पुढे येत आहे.

पालघर जिल्हा परिषदेतील सदस्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ होत आला आहे. गेली दोन वर्षे करोनाकाळ असल्याने अभ्यास दौरा झाला नव्हता. मे महिन्याच्या अखेरीस अचानक दौरा आयोजित करण्याचे प्रयोजन आखण्यात आले आहे. दिल्ली, चंडीगड, पंजाब व कुलू-मनाली असा दौरा ठरवण्यात आला असून त्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.

या दौऱ्यातील सदस्य वर्गाला सुरुवातीला रेल्वेने नेण्याचा विचार होता, मात्र अचानक घूमजाव करत सर्व सदस्य वर्गाला विमानाने नेण्याचा घाट विद्यमान पदाधिकाऱ्यांमार्फत घालण्यात आला. दौरा करण्याचे अनौपचारिक ठरल्यानंतर त्याला सुमारे २३ ते २५ लाखांच्या जवळपास खर्चाचे नियोजन करण्यात आले असून उर्वरित निधी कोणत्या माध्यमातून उभा केला जात आहे, याबद्दलची चर्चा सध्या जिल्हा परिषदेत रंगली आहे.

जिल्हा परिषदेमार्फत अशा दौऱ्यासाठी पाच लाख रुपयांची कमाल तरतूद असते. त्याचे नियोजन सामान्य प्रशासन विभागामार्फत केले जाते. मात्र या दौऱ्याचे नियोजन विभागाने केले नसल्याचे तसेच त्याचा कार्यक्रम अजूनही मंजुरीसाठी नियोजित नसल्याचे विभागप्रमुखांमार्फत सांगितले गेले आहे. दौऱ्यासाठी अवघे चार-पाच दिवस उरले असताना दौऱ्याचे प्रशासकीय नियोजन झाले नसल्याबद्दल आश्चार्य व्यक्त होत आहे.

दौऱ्याच्या नियोजनासाठी सुरुवातीला एका महिला पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन खर्चाचे नियोजन करावयाचे होते. मात्र दौऱ्यासाठी अवाजवी खर्च होत असल्याने त्यांनी ही जबाबदारी दुसरे एक पदाधिकारी यांच्याकडे दिली. त्यांच्यामार्फत एका पर्यटन करणाऱ्या कंपनीमार्फत सदस्य वर्गाची विमानांची तिकिटे काढल्याचे समजते. हे सर्व सुरू असताना त्याची माहिती प्रशासनाला नसावी ही बाब धक्कादायक आहे. या दौऱ्यासाठी काही सदस्य वर्ग स्वत:चा पैसा देत असल्याचे दाखवले जात असले तरीही अवास्तव खर्चाच्या नियोजनामुळे हा अभ्यास दौरा वादग्रस्त ठरणार असे दिसून येत आहे.

खर्चाबाबत अस्पष्टता

दौऱ्यासाठी शासकीय निधीचे प्रयोजन असताना त्यामध्ये आणखीन खर्च दाखवून जिल्हा परिषदेने हे पैसे कोणाकडून घेतले, याबाबत अस्पष्टताच आहे. तर काही खात्यातील अधिकारी वर्गाकडून व ठेकेदारांकडून अभ्यास दौऱ्यासाठी पैसे मागितल्याची चर्चा आहे.

अभ्यास दौऱ्याचे नियोजन व त्याची सविस्तर माहिती अजूनही उपलब्ध झालेली नाही. उपाध्यक्ष या दौऱ्याचे नियोजन करत असल्याचे समजते. ती प्राप्त झाल्यानंतर माहिती दिली जाईल. – संघरत्ना खिलारे, विभागप्रमुख, सामान्य प्रशासन विभाग, जि. प. पालघर