सानुग्रह अनुदानासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन

पालघर : करोनामुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले असून करोना मृतांच्या नातेवाईकांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

करोना संक्रमणाच्या वेळी आयसीएमआरतर्फे जाहीर यादीनुसार वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ९९४ व पालघर ग्रामीण कार्य क्षेत्रामध्ये १ हजार २२१ अशा एकूण ३ हजार २१५ नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. मृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने मंजूर केली असून १५ डिसेंबरपर्यंत वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात ५५२ तर पालघर ग्रामीण भागातून २९९ असे एकंदरीत ८५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. करोना मृतांच्या कुटुंबीयांनी  http://www.mahacovid19relief.in या संकेतस्थळावर आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुरसळ यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्यात काहींना अडचणी

करोना मृतांच्या कुटुंबीयांना अर्ज भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आवश्यक िलक सुरू न होणे, कागदोपत्री पुरावे अपलोड न होणे किंवा त्रास होणे तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतरदेखील फॉर्म पूर्णपणे भरल्याची पुष्टी न होणे अशा अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्याऐवजी शासनाने कागदपत्रांची छायांकित प्रत घेऊन प्रत्यक्षात अर्ज भरले असते तर सोयीचे झाले असते, असे मत संबंधित व्यक्त करीत आहेत.

अर्जाच्या पडताळणीत अडथळे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना मृतांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या अर्जाची विविध शासकीय पातळीवर पडताळणी करणे आवश्यक असून ती करताना शासकीय अधिकाऱ्यांनादेखील विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रत्यक्षात अर्ज दाखल करताना अनेक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य असून ते केल्याशिवाय अर्ज भरण्याची क्रिया पूर्ण होत नसते. मात्र प्रत्यक्षात पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य कागदपत्रे अर्जासोबत दिसत नाहीत. तर काही ठिकाणी अर्ज केलेल्या नागरिकांच्या ऐवजी अन्य जिल्ह्यातील मृतांच्या कुटुंबीयांची माहिती सोबत दिसून येत आहे. काही ठिकाणी मृत झालेल्या व्यक्तींची नावे आयसीएमआरच्या यादीत नसल्याने असे अर्ज बाद होण्यास कारणीभूत ठरत आहेत.