डहाणू : विक्रमगड तालुक्यातील ओंदे ग्रामपंचायतीच्या खरपडपाडा येथे जाण्यास अजूनही पूर्णपणे पक्का रस्ता तयार झालेला नाही. रोजगार हमी योजनेतून येथे कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे परंतु खडी पूर्णपणे निखळून हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे खरपडपाडय़ातील सुमारे पाचशेहून अधिक रहिवाशांची गैरसोय होत आहे.

विक्रमगड तालुक्याच्या वेशीवर औंदे ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत खांडचा बंधाऱ्याजवळ खरपडपाडा वसला आहे. मात्र येथील आदिवासी कुटुंबांचा वीज, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य अशा प्राथमिक गरजांसाठी संघर्ष सुरूच आहे. येथे सरकारी वाहनांचा अभाव आहे. एखाद्या सरकारी योजनेचा पाठपुरावा करायचा असल्यास येथील ग्रामस्थांना पायी किंवा खासगी वाहनाशिवाय जाण्याचा पर्याय नाही. त्यातच खरपडपाडय़ाचा रस्ता अत्यंत वाईट अवस्थेत आहे त्यामुळे येथून वाहतूक अथवा ये-जा करणे अधिकच कठीण झाले आहे. खरपडपाडय़ाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन हा रस्ता लवकरात लवकर शासनाने बांधून द्यावा, अशी विनंती रुपेश उराडे आणि  ग्रामस्थांनी केली आहे.