scorecardresearch

निर्बंधमुक्तीनंतर होळीचा जल्लोष; दोन वर्षांतील मरगळ झटकत पालघर जिल्ह्यात पुन्हा रंगाची उधळण

धुळवडीच्या एक दिवसा अगोदर रात्री  होलिकादहन सर्वत्र पार पडली.

पालघर : करोनातील दोन वर्षांच्या निर्बंधमुक्तीनंतर आलेली मरगळ झटकत पालघर जिल्ह्यात शहारांसह ग्रामीण भागात रंगांची उधळण करत होळी जल्लोषात साजरी करण्यात आली.   रस्तोरस्ती व गल्लीबोळात   होळीगीतांच्या तालावर ठेका धरत लहानांपासून मोठय़ांपर्यंत अनेकांनी धुळवाडीचा आनंद घेतला.  ग्रामीण जिल्ह्यात होळीचा आनंदोत्सव तीन -चार दिवसांपासून सुरू झाला होता. 

धुळवडीच्या एक दिवसा अगोदर रात्री  होलिकादहन सर्वत्र पार पडली. यंदा करोनाचा हवा तसा प्रभाव नसल्याने नागरिकांनी घराबाहेर पडून होलिका मातेचे मनोभावे पूजन केले. जगावरील आलेली संकटे दूर कर अशी प्रार्थना सर्वत्र केल्याचे दिसून आले. लहानांपासून ते मोठय़ांपर्यंत सर्वाच्याच चेहऱ्यावर होळी सणाचा आनंद द्विगुणित झाल्याचे दिसले. गेल्या दोन वर्षांत लग्न झालेल्या जोडीला होळीची पूजा न करता आल्याने यंदा या नवदाम्पत्यांनी कुटुंबासमवेत मनोमन होलिकेचे पूजन करून सुखी संसाराची प्रार्थना केली.

होळी सणाला महत्त्व असल्याने बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहक व विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले. यंदा केमिकलमिश्रित रंगांऐवजी साधे गुलालाचे रंग घेण्यास मोठी पसंती होती. दोन वर्षे धुळवड साजरी केली नसल्याने लहानांनी तर पिचकाऱ्या, विविधरंगी रंग, फुगे अशी भरघोस खरेदी केली. त्यांना धुळवड साजरी करण्यात येणार असल्याने त्यांच्या पालकांमध्ये उत्सुकता व आनंद निर्माण झाला. असाच आनंद ग्रामीण भागातही पाहावयास मिळाला.

जिल्ह्यातील काही गावांमध्ये एक गाव एक होळीची परंपरा आजही कायम आहे. सर्वानी एकत्रित येत एकमेकांचे सुखदु:ख वाटावे या उद्देशाने एकच सार्वजनिक होळी आजही ठेवली जाते.

तापमानात उष्णता असली तरी धुळवडीच्या दिवशी सकाळपासूनच तरुणाई रंगात न्हाऊन निघाली. लहानांनीही धुळवडीची यथेच्छ मजा लुटली. ज्येष्ठानी एकत्रित येत होळीच्या जुन्या आठवणींना उजाळा नव्या उमेदीने धुळवडीचा आनंद घेतला.तर महिलावर्गही धुळवडीत रंगीबेरंगी झाल्या होत्या. दोन वर्षांनंतर होळी सण साजरा करायला मिळाल्याने सर्व स्तरातील नागरिकांनी होळीची मौज मजा लुटली. खाद्य पदार्थाची रेलचेल पहावयास मिळाली.

पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारे सण साजरा करण्यासाठी पर्यटक व स्थानिकांनी बहरून गेले होते.

मोठय़ा प्रमाणात मांसाहारी खाद्यपदार्थाना पसंती मिळाली. यंदा कोंबडीच्या मांसाऐवजी बोकडाच्या मटणाला मोठी मागणी दिसली. ते घेण्यासाठी रांगाच रांगा लागलेल्या होत्या.

मच्छीमार, आदिवासींमध्ये मोठा उत्साह

जिल्ह्यात मच्छीमार बांधवांच्या कोळीवाडय़ात होळी अर्थात हावलूबायचे मोठे स्थान आहे.  धुळवडीच्या दिवशी मासळी विक्रेत्यानी आपला मासळी बाजार बंद ठेवून धुळवडीचा आनंद  लुटला. ग्रामीण भागात आदिवासी समाजातही होळीला मोठा मान मरातब असतो. तब्बल दहा दिवसाआधीपासूनच होळी सुरू केली जाते. सहकुटुंब  होळी साजरी करतात. दोन वर्षांपूर्वीचा तोच उत्साह पुन्हा दिसून आला. परंपरेप्रमाणे होळी सणाला पूजन करूनच आदिवासींनी कैरी खाण्यास सुरुवात केली.  विविधरूपी सोंगे घेऊन हातात ढोल, थाळय़ा, पारंपरिक वाद्ये घेऊन लहानांपासून ते ज्येष्ठापर्यंत शिमगट, शिमगट तोटेरा..नितल नितल कनेरा, बलेररर, बलेररर, ब्लेररर अशी गाणी गाऊन घरोघरी जाऊन होळीनिमित्ताने बक्षीस मागण्याची प्रथा आजही कायम असल्याचे पाहण्यास मिळाली.  वाडवळ-माळी, कुणबी, भंडारी आदी समाजतही होळी उत्साहात साजरी करण्यात आली.   खाद्यासंस्कृतीसाठी समाज परिचित असल्याने या समाजातील महिलावर्गाने  होळीला खमंग पुरणपोळी व खाद्यापदार्थाचा बेत आखला होता. त्याचा आस्वाद कुटुंबासह मित्रमंडळींनी घेतला.  पूर्वापार पद्धतीने  होळीला शहाळे (नारळ), पुरणपोळी, बताशे अर्पण करण्यात आले.

दोन हजार होलिकांचे दहन

कासा :  पालघर जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या सुमारे दोन हजार होलिकांचे (होळी) दहन करण्यात आले. होळीसाठी लहान मुले, तरुण मंडळी प्रत्येक घराघरातून लाकडे, पेंढा, गवत, बांबू गोळा करून गावाच्या मध्यभागी माळाच्या ठिकाणी (होळीची जागा) ठेवण्यात आले होते. त्याचे विधिवत दहन करण्यात आले.  ग्रामीण भागांत  ढोलताशाच्या गजरात महिलांनी आरत्या घेऊन होलिकांचे पूजन केले. रंगपंचमीला झाडपाला, फुलांपासून तयार केलेला नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात आला. होळी सणासाठी साखरेपासून बनविलेल्या हलव्याचे दागिने म्हणजेच हरडे-करडे (साखरेची गाठी व साचार गाठीचे वेगवेगळे अलंकार) यांना मोठय़ा प्रमाणावर महत्त्व असल्याने ते खरेदीसाठी बाजारात गर्दी होती. होळी व धुळवडीच्या दोन दिवस ग्रामीण भागात खेडय़ापाडय़ांवर रात्रभर  तारपा, गरबा, ढोलनृत्यांचा यावेळी फेर धरण्यात आला. नवविवाहितांनी  होळीभोवती फिरून राग, द्वेष, लोभ, मत्सर या आपल्या अग्नीत जळून खाक होऊ दे, अशी मनोभावे प्रार्थना केली.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Holi celebration after ban spray colour again palghar district akp

ताज्या बातम्या