डहाणू : मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वेचे काम सध्या डहाणू तालुक्यात जोरदार सुरू आहे. माती भरावासाठी डोंगर, टेकडय़ा आणि शेतजमिनींना लक्ष्य केले जात आहे. मात्र महसूल विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी नाराज आहेत. नुकतेच माती भरावासाठी, चिखले येथील एका शेतकऱ्याच्या शेतात तब्बल ४० फूट खोल खड्डा खणून माती उत्खनन करण्यात आले. तसेच ऐना या गावात भरावासाठी लागणारी माती आणि मुरुमासाठी शेतजमिनीत बेकायदा उत्खनन करून अन्य शेतकऱ्यांच्या शेतीची मोठी नासधूस केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची मागणी होत आहे. संबंधितप्रकरणी महसूल कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी व पंचनामा करण्यात येणार आहे, असे डहाणूचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी सांगितले.

जेएनपीटी ते बडोदा या एकूण ४४६ किमी अंतर असलेल्या ८ लेनच्या द्रुतगती महामार्गासाठी डहाणू तालुक्यातील अनेक गावातील डोंगर टेकडय़ा तसेच भातशेतीत उत्खनन करून माती भराव कामाला सुरुवात झाली आहे. डहाणू तालुक्यातील ऐना या गावातील आदीवासी खातेदारांच्या सव्‍‌र्हे क्र. १५ या एक्स्प्रेस वे शेजारील ८ एकर सामाईक शेतजमिनीत एक्स्प्रेस वेच्या ठेकेदार कंपनीने शेतकऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता थेट जेसीबीच्या साहाय्याने जवळपास १५ ते २० फूट खोल बेकायदा खोदकाम करून हजारो ब्रास माती आणि मुरूम काढला आहे. जवळपास सहा एकर क्षेत्रांत भातशेतीचे नुकसान केले आहे. याविरोधात ऐना येथील आदिवासी शेतकऱ्यांनी डहाणूच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे शेतजमिनीची नासधूस केल्याप्रकरणी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

ठेकेदारांची मनमानी
मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वेसाठी पालघर जिल्ह्यातील विरार ते तलासरी या ७८ किमीच्या विभागातील भूसंपादनाचे बहुतेक काम पूर्ण होत आल्याने आत्ता जमिनीवरील प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मासवण ते गंजाड या पॅकेज १२ मधील मासवण, काटाळे, निहे, नागझरी, किराट, बोरशेती, रावते, चिंचारे, दाभोण, ऐना, रनकोळ, नवनाथ, चांदवड आणि गंजाड या गावात जमिनीचे सपाटीकरण आणि मातीचा भराव यांसारख्या प्राथमिक कामांना ठेकेदार कंपनीकडून सुरुवात करण्यात आली आहे. मात्र एक्स्प्रेस वेच्या ठेकेदाराने शेतजमिनीत जेसीबी फिरवून अतोनात नुकसान केल्याने संबंधित कुटुंबाला शेतीला मुकावे लागणार आहे.