विविध प्रकल्पांसाठी परवानगीपेक्षा जास्त खनिज उत्खनन
पालघर : पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुंबई- वडोदरा राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर प्रकल्पांसाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार गौण खनिज उत्खनन सुरू आहे. परवानगीपेक्षा जास्त गौण खनिज सुरुंग स्फोटके लावून काढले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. सुरुंग स्फोटामुळे परिसरातील गावांतील ग्रामस्थही भयभीत झाले आहेत.
एखाद्याा प्रकल्पातील बांधकामासाठी मुरुम, खडक, माती, वाळू आदी गौण खनिजांचा वापर होतो. जिल्ह्यात मुंबई-वडोदरा या राष्ट्रीय महामार्गासह अनेक प्रकल्प सुरू आहेत. ही उत्खननातून काढली जातात. त्यासाठी परवानगी आवश्यक असते. परंतु काही ठिकाणी ही परवानगी न घेता खनिजासाठी उत्खनन सुरू आहे. परवानगी जरी असली तरी मर्यादेपेक्षा जास्तीच्या प्रमाणात खनिजे काढली जात आहेत. पेसा कायद्याअंतर्गत येणाऱ्या खडकोली ग्रामपंचायतीमध्ये बेकायदा अवास्तव गौण खनिजासाठी उत्खनन सुरू आहे, असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या सुरुंग स्फोटांमुळे संपूर्ण गावाला हादरा बसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उत्खनन करतेवेळी केल्या जाणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्यामुळे जिवाला मोठा धोका पोहोचण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. खडकोलीत वन खात्याने बांधलेल्या पाणी अडवा पाणी जिरवाचा बंधारा तसेच विहिरी उत्खननामध्ये जमीनदोस्त झाल्या आहेत. नैसर्गिक नालाही गायब झाला आहे. खडकोलीतील ग्रामस्थांनी मोठय़ा संख्येने एकत्रित येत या खदानीवर काम बंद करण्यासाठी आंदोलन केले होते. त्या वेळी कोणत्याही परवानग्या कामाच्या ठिकाणी ठेवल्या नसल्याचे निदर्शनास आले होते. या उत्खननामधून निघणारी खडीयुक्त धूळ आजूबाजूच्या बागायतीच्या पिकांचे नुकसान करणारी आहे. या प्रकरणात उत्खनन करणाऱ्या कंपनी व्यवस्थापनाकडे दोन दिवसांपासून विचारणा केली असता त्यांचा प्रतिसाद आलेला नाही.
राष्ट्रहिताच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनीवर उत्खनन करून त्यांचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. नैसर्गिक नाले, विहिरी नष्ट झाल्या. आता पर्यावरण, भातशेती, बागायती नष्ट होणाच्या मार्गावर आहेत. हा विकास नव्हे अधोगती आहे. उत्खनन बंद करा, अशी मागणी बाधित शेतकरी – जितेंद्र गांगडे यांनी केली आहे. गौण खनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीमार्फत पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे ग्रामपंचायतीमध्ये चुकीच्या पद्धतीने गौण खनिज उत्खनन ना-हरकत दाखला घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे गावकरी भयभीत आहेत, असे प्रभाग अ सदस्य जयवंती दर्शन मोरे यांनी सांगितले.
‘प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास’
पालघर जिल्ह्यात मुंबई-वडोदरा अतिजलद महामार्गसह विरार-डहाणू चौपदरीकरण, समर्पित फ्रेट कॉरिडॉर, वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आदी प्रकल्प येऊ घातले आहेत. या प्रकल्पांसाठी पालघर जिल्ह्यातील डोंगर, वन जमिनी अशा विविध जमिनींवर उत्खनन करून त्यातील गौण खनिज या प्रकल्पांना पुरवले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होणार असून नैसर्गिक संसाधनांचा विनाश होत असल्याचा आरोप पर्यावरणवादी संस्था करीत आहेत.
नियमावलीला बगल
सुरुंग स्फोटाद्वारे गौण खनिज उत्खनन करताना स्फोटके नियमावलीनुसार काम करणे आवश्यक आहे. मात्र अनेक ठिकाणी नियमावलींना बगल देण्यात आल्याचे दिसते. स्फोटके ठेवण्यासाठी सुरक्षित जागेचा अभाव असतो. एखाद्या अपघाताची शक्यता लक्षात घेता अग्नी सुरक्षा यंत्रणा ठेवणे आवश्यक असते परंतु ती काही ठिकाणी नसते. गौण खनिज उत्खनन केल्यानंतर या खडी तयार करण्याची यंत्रणा ज्या ठिकाणी उभारली जाते त्या जागेवर तात्पुरती औद्योगिक अकृषिक जमीन परवानगी घेतली जात नसल्याचे सांगितले जाते. दरम्यान, खडकोली गावात उत्खनन केलेल्या ठिकाणी उत्खनन करू नये अशी मागणी ग्रामस्थांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्याकडे केल्यानंतरही प्रशासनाने त्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आमदार राजेश पाटील यांनी पुढाकार घेऊन या प्रकरणात लक्ष घालाव, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार तहसीलदार यांना उत्खनन केल्या जाणाऱ्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यास सांगितले आहे. तेथे गौण खनिज नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
– धनाजी तोरस्कर, उपविभागीय अधिकारी, पालघर