खासगी प्रवासी वाहनचालकांची मनमानी

डहाणू :  ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनामुळे डहाणू, जव्हार, तलासरी एसटी आगारात १०० टक्के बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झालेला असला तरी खासगी प्रवासी वाहतूक दारांकडून प्रवाशांची लूट सुरूच आहे. 

लांब पल्ल्याच्या प्रवासाला वाटेल ते भाडे सांगितले जात आहे. तर नाईलाजाने सणासुदीला बाहेरगावी गेलेल्या नागरिकांकडून दोन ते तीन पटीने भाडे आकारले जात आहे. डहाणू नाशिक तसेच पुणे, ठाणे, भुसावळ, नगर अशा ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना मोठय़ा आर्थिक नुकसानीला सामना करावा लागत आहे. डहाणू येथील काही पाडय़ांना शहरात येण्यासाठी २०० ते २५० रुपये तर परतण्यासाठी तेवढेच पैसे मोजावे लागत आहे.  डहाणू आगार व्यवस्थापक बेहरे यांनी  शंभर टक्के बसफेऱ्या बंद असल्याचे सांगितले.

डहाणू, तलासरी, विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा हे तालुके तसेच पालघर ग्रामीणचे दुर्गम भाग आदिवासी पाडय़ांनी जोडले गेले आहेत. येथील गाव पाडय़ांना बसच्या दळणवळणाशिवाय पर्याय नाही.  रोजगार, बाजार तसेच इतर कारणांसाठी जाण्यायेण्यासाठी नागरिकांना खासगी रिक्षा तसेच प्रवासी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे.   एसटी वाहतूक बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिक मेटाकुटीला आले आहेत. अनेक पाडय़ातील लोक पायी चालत प्रवास करू लागले आहेत. मात्र आजारी रुग्ण, वयोवृद्ध नागरिक, गरोदर माता यांना या आंदोलनाचा फटका बसला आहे.