कासा : डहाणू – कासा मार्गालगत सुरू असलेल्या वीज दुरुस्तीच्या कामांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी (MSEB) आणि ठेकेदारांचे कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याने यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने (MSEB) सध्या पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात डहाणू-कासा मार्गालगत विद्युत वाहिन्यांची आणि विजेच्या खांबांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र, या दुरुस्तीचे काम करत असलेल्या कामगारांच्या सुरक्षिततेकडे ठेकेदार तसेच महावितरण विभाग संपूर्णतः तडजोड करत असल्याच चित्र समोर आले आहे.
सध्या डहाणू येथील रानशेत परिसरात सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामध्ये कार्य करत असणारे कामगार ४० ते ५० फूट उंचीच्या विजेच्या खांबावर चढून विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती कार्य करत आहेत. मात्र या कामाच्यावेळी कामगारांकडे कोणतेही सुरक्षा कवच, हेल्मेट, हार्नेस किंवा इतर आवश्यक सुरक्षाविषयक साधने उपलब्ध नाहीत. केवळ दोरीच्या साहाय्याने विजेच्या खांबावर चढून हे कामगार जीव धोक्यात घालून काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सध्या राज्यात तापमानाचा पारा उच्चांकी पातळीवर असून, या तळपत्या उन्हात कामगार कोणत्याही सुरक्षेच्या साधनांचा आधार न घेता, थेट विजेच्या खांबांवर काम करत आहेत. यामुळे एखादा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महावितरणकडून अशा कामांसाठी ठेकेदार नेमण्यात आले असले तरी, या ठेकेदारांकडून कामगारांच्या सुरक्षिततेबाबत हलगर्जीपणा केला जात आहे. नियमांनुसार अशा उंचीवर काम करताना सुरक्षिततेबाबतच्या सर्व आवश्यक सुविधा कामगारांना पुरवण बंधनकारक असताना प्रत्यक्षात मात्र या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.
हे सर्व प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असताना देखील अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून आली नाही. स्थानिक नागरिक आणि कामगार संघटनांकडून याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच महावितरण अनर्थ होण्याची वाट बघत आहेत का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
आता महावितरण आणि प्रशासन ठेकेदारांविरोधात कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
महावितरण कडून सध्या कासा मार्गालगत कोणतेही काम सुरू नाही. मात्र कामादरम्यान महावितरण कर्मचाऱ्यांचे विशेष काळजी घेतली जाते. याकरिता त्यांना लागणाऱ्या सगळे साहित्य पुरविले जाते. – सुनील भारंबे, महावितरण अभियंता, पालघर