वाडा : वाडा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्ह्याचा दर्जा मिळावा म्हणुन अनेक वर्षांची मागणीला सार्वजनिक आरोग्य विभागाने मार्च २०२१ मध्ये मान्यता दिली. मात्र चार वर्षांचा कालावधी लोटूनही जागेअभावी उपजिल्हा रुग्णालय कागदोपत्रीच राहिल्याने रुग्णालयातील अपुऱ्या सोयी – सुविधांमुळे रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. पर्यायाने रुग्णांना अनेकदा जमिनीवर व खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची वेळ येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
वाडा तालुक्याला सत्ताधारी पक्षातील तीन आमदार व एक खासदार व विरोधी पक्षातील एक खासदार हे महत्वाचे चार लोकप्रतिनिधी लाभून देखील या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शासन दरबारावरून कुठलीही हालचाल होत नसल्याने नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.
वाडा तालुक्यातील औद्योगीकरणामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत दोन लाखांच्या आसपास पोहचली आहे. भिवंडी ग्रामीण, विक्रमगड, शहापूर या तीन विधानसभा मतदार संघ तर भिवंडी व पालघर लोकसभा मतदार संघातील वाडा हे मध्यवर्ती ठिकाण असुन वाडा ग्रामीण रुग्णालयात वाडा तालुक्यासह विक्रमगड, जव्हार, मोखाडा, शहापूर या अन्य तालुक्यांतील दुर्गम भागांतील अनेक नागरिक (रुग्ण) मोठ्या प्रमाणावर या ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी येत आहेत.
५० वर्षांपूर्वी त्यावेळच्या लोकसंख्येचा विचार करून ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय बांधण्यात आले आहे. मात्र आताच्या व वाढत्या लोकसंख्येचा विचार करता हे रुग्णालय अपुरे पडत आहे. अशा वेळी रुग्णांना जमिनीवर झोपवून उपचार घ्यावे लागतात. श्वानदंश, सर्पदंश, विंचूदंश, गॅस्ट्रो, विषबाधा सारख्या रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शिवाय येथील महामार्गावरील अपघातांची संख्याही मोठी आहे. त्याचा ताण या ग्रामीण रुग्णालयावर पडतो.
अनेकदा वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावतात. अथवा त्यांना पुढील उपचारांसाठी ठाणे, मुंबई येथे रुग्णांना पाठवावे लागते. त्यामुळे वाडा येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजुर असुन ते लवकरच सुरू झाल्यास रूग्णांना मोठा दिलासा मिळेल. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड व वैद्यकीय अधिक्षक यांच्याशी चर्चा केल्याचे भाजपचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष नरेश आकरे यांनी सांगितले.
वाडा ग्रामीण रुग्णालयात ५ पदे रिक्त –
वाडा ग्रामीण रुग्णालयात २७ पदे मंजुर आहेत. त्यातील वैद्यकीय अधिकारी (२ कंत्राटी), सफाई कामगार (२), कक्ष सेवक (१) तर आश्रमशाळा पथकातील औषध निर्माण अधिकारी (१) हे पदे रिक्त आहेत. त्यातच औषधांचा तुटवडा, अद्यावत सोयी सुविधांचा अभाव निर्माण झाल्याने रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यात मोठी अडचणी येत आहेत. यामुळे रुग्णांचे आरोग्यच व्हेंटिलेटरवर आल्याने ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर कधी होणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
पाच एकर जागेची आवश्यकता –
शासनाने मंजुर केलेले शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाची साडेतीन एकर जागा अथवा बस आगारामधील पाच एकर जागेचा प्रस्तावाचा पर्याय पुढे आला आहे. यात सहा मजली इमारत उभारून अद्यावत मशिनरी, वैद्यकीय सेवा, सोयी – सुविधा उपलब्ध करून दिल्यास रुग्णांचे हाल कायम थांबणार आहेत.
मात्र या जागेबाबत म्हणावे तसे प्रयत्न होत असताना दिसुन येत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे वाडा तालुक्याला लाभलेल्या लोकप्रतिनिधी यांनी प्रशासन व शासनस्तरावर पाठपुरावा करून ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी लावावा आणि सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारुन वाडावासियांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे. दरम्यान या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन कसा मार्ग काढतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वाडा ग्रामीण रुग्णालयात औषधसाठ्यांचा तुटवडा –
सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालयाला शासनाच्या आरोग्य विभागाकडून येणारा औषधसाठा हा प्रति महिना बाह्यरुग्ण ३ ते ४ हजार तर आंतररुग्ण १५० ते २०० याप्रमाणे मिळतो, मात्र रुग्णांची संख्या जवळपास तीन पट वाढली असल्याने औषधांचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णालयाला महिन्याभराचा मिळणारा औषधांचा साठा अवघ्या १५ दिवसांच्या आताच संपला जात असल्याने अनेकदा रुग्णांना वंचित रहावे तर काही वेळा बाहेरून विकत घेण्याची वेळ येते.
दररोज ३२५ रुग्णांवर उपचार –
वाडा ग्रामीण रुग्णालयात दररोज साधारण ३०० ते ३२५ बाह्यरुग्ण (ओपीडी) तर आंतररुग्ण १२ म्हणजेच महिन्याला बाह्यरुग्ण ९५०० तर आंतररुग्ण ४०० आसपास उपचार घेत असतात.
स्त्रीरोग तज्ञावर अतिरिक्त भार –
वाडा ग्रामीण रुग्णालयात दरमहा ८० ते ९० प्रसूती होतात. यातील २५ ते ३० गुंतागुत प्रसूती (सीझर) असतात. यापूर्वी गुंतागुंतीच्या प्रसुतीसाठी महिलांना ठाणे व मुंबई येथील रुग्णालयात जावे लागत होते. मात्र येथे स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.हर्षदा पाटील ह्या पूर्णवेळ काम पाहत असल्याने ही समस्या काहीशी मिटली आहे. असे असले तरीही त्यांना सहाय्यक स्त्रीरोग तज्ञ, भूलतज्ज्ञ पूर्ण वेळ नसल्यामुळे त्यांच्यावर मोठा ताण येत आहे.
वाडा ग्रामीण रुग्णालयात २७ पदे मंजुर असुन २२ पदांवर (वैद्यकीय अधिकारी २ पदे कंत्राटी वगळता) रुग्णालयाचे कामकाज सुरु आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे या रुग्णालयावर मोठा भार येत आहे. उपजिल्हा रुग्णालय झाल्यास ९५ पदे मंजुर होतील. व त्यामुळे रुग्णसेवा अधिक बळकट होईल
डॉ. यादव शेखरे, वैद्यकीय अधिक्षक, वाडा ग्रामीण रुग्णालय
उपजिल्हा रुग्णालयाकरिता वाडा ग्रामीण रुग्णालयाची जागेची आम्ही वास्तुविशारद यांच्याकडुन पाहणी केली असता ही जागा योग्य नसल्याचा वास्तुविशारद यांचा अहवाल आहे. त्यामुळे नवीन जागेचा पर्याय शोधावा.
संजय डोंगरे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाडा
वाडा ग्रामीण रुग्णालयाकरिता शिरीष फाटा येथील जागेचा प्रस्ताव नामंजुर झाला आहे. मात्र वाडा ग्रामीण रुग्णालयाची अडीच एकर पेक्षा अधिक जागा उपलब्ध आहे, त्याच जागेमध्ये व्हर्टिकल (उभ्या दिशेने) पद्धतीने इमारत उभारण्याचा प्रस्ताव जिल्ह्याला पाठविलेला आहे.
भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार, वाडा
वाडा ग्रामीण रुग्णालयाकडून मिळालेली आकडेवारी –
मागील – एका वर्षाची आकडेवारी
(१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५
आंतररुग्ण – ५,५८२
बाह्यरुग्ण – १ लाख १४ हजार
प्रसूती- ९४२