बोईसर : पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवन बंदर प्रकल्पामुळे परिसरातील जमिनींना सोन्याचा भाव आला असून खाजगी मालकीच्या जागांची खरेदी विक्री जोरात सुरू आहे. जमिनीचे व्यवहार करताना काही ठिकाणी दलालांकडून बनावट कागदपत्रे आणि दस्तावेजाद्वारे शेतकऱ्यांची जमीन हडप करून फसवणूक केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. वाढवण जवळील आंबिष्टेवाडी येथे अशाच एका प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जागा हरपत जागेची परस्पर विक्री करून फसवणूक करणाऱ्या पाच व्यक्तींविरोधात वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रस्तावित वाढवण बंदर नजीक आंबिष्टेवाडी येथे बारकू महाद्या भंडारी यांच्या नावे गट क्रमांक ८०/५ मध्ये १.०१.०० हेक्टर जागा आहे. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांची मुलगी वेणूबाई बाबुराव पाटील व कुटुंबाचा या जमिनीवर ताबा असून सुमारे ४० वर्षांपासून ते या जागेवर वंशपरंपरागत रीतीने शेती करत आहेत. मात्र राजेंद्र दशरथ राऊत यांनी आंबिष्टेवाडी गावातीलच रोहित दत्तात्रय राऊत याच्या मदतीने त्याचे मयत आजोबा बारकू मरकड्या राऊत यांच्या नामसाधर्म्याचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रे व दस्तावेज बनवून महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बारकू मरकड राऊत यांच्या वारसांची नोंद जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर करून जमीन हडप केल्याची लेखी तक्रार हर्षद बाबुराव पाटील यांनी पालघर चे पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वानगाव पोलीस ठाण्यात करून जमीन हडप करणाऱ्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करून न्याय देण्याची मागणी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी बोईसर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी सखोल चौकशी केली केल्यानंतर राजेंद्र दशरथ राऊत, रोहित दत्तात्रय राऊत, मंगळा बारक्या राऊत, गणेश बारकू राऊत आणि वत्सला दत्तात्रय राऊत यांच्या विरोधात माणगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.