मागील वर्षीच्या तुलनेत पाच पटीहून अधिक नोंदणी 

वसई: वाढत्या इंधन दरवाढीमुळे आता नागरिक विद्युत वाहनांच्या खरेदीला पसंती देऊ लागले आहेत. त्यामुळे विद्युत वाहनांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. यंदा वसईत ९६५ नवीन विद्युत वाहने दाखल झाली आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत या वाहनांच्या संख्येत पाच पटीने वाढ झाली आहे.

 पेट्रोल, डिझेलच्या शंभरीपार केलेल्या किमती, सातत्याने होणारी दरवाढ यामुळे अनेक वाहनचालक आता विद्युत वाहन खरेदीकडे वळू लागले आहेत. पेट्रोल, डिझेल वाहनांच्या तुलनेत हे बचतकारक असून पेट्रोलपंपावर रांग लावणेही यामुळे टाळता येते असे विद्युत वाहनधारक सांगत आहेत. 

 मागील वर्षांपासून वसईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात विद्युत वाहन नोंदणीची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. सन २०२०-२१ मध्ये १८६ विद्युत वाहनांची नोंद करण्यात आली होती. २०२१-२२ मध्ये आतापर्यंत ९६५ इतक्या वाहनांची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पाच पटीहून अधिक वाहने नोंदणी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या वाहनांमध्ये ७६४ दुचाकी, १६३ चारचाकी, सहा ई-रिक्षा आणि ११ तीनचाकी वाहने तर इतर २१ अशा एकूण ९६५ वाहनांची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती वसई उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली.

 दैनंदिन व जवळपासच्या प्रवासासाठीही विद्युत वाहने उपयुक्त ठरत आहेत. इंधनाच्या खर्चापेक्षा चार्जिग करण्यास लागणाऱ्या विजेचा खर्च कमी आहे. 

एकदा तीन ते चार तास वाहन चार्जिग केले की ते वाहन साधारणपणे ९० ते १०० किलोमीटपर्यंत चालते. त्यामुळे पैशाची चांगली बचत होऊ लागली आहे, असे विद्युत दुचाकी चालक दीपक सोनकुसडे यांनी सांगितले. 

अधिक चार्जिग केंद्रांची गरज

प्रदूषण कमी करण्यासाठी विद्युत वाहनांचा वापर अधिकाधिक व्हावा, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. सध्या अनेक वाहनधारक घरच्या घरीच वाहने चार्ज करताना दिसतात. शहरामध्ये यासाठी चार्जिग केंद्रे जागोजागी तयार होण्याची गरज वाहनचालक बोलून दाखवत आहेत. 

वाढत्या इंधन किमतीमुळे मी विद्युत दुचाकी खरेदी केली. त्याचा चांगला फायदा होत आहे. मला २० पैसे प्रति किमी इतका वीज खर्च येतो. त्यामुळे मी आणखी एक इलेक्ट्रिक वाहनही खरेदी करणार आहे. – हेमंत धुमाळ, इलेक्ट्रिक वाहनधारक

विद्युत वाहने  परवडणारी असल्याने नागरिकांचा त्याकडे कल दिसत आहे. परिवहन कार्यालयात दिवसेंदिवस या वाहनांच्या नोंदणीत वाढ होते आहे. – प्रवीण बागडे, साहायक उपप्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी