पालघर : अति जलद रेल्वे प्रकल्प अर्थात बुलेट ट्रेन करिता पालघर तालुक्यातील जलसार येथील डोंगरामध्ये बोगदा खणण्याचे काम हाती घेण्यात आले असून यामुळे परिसरातील घरांच्या भिंतीला व फरशीला तडे जाण्याचे प्रकार घडले आहेत. यादृष्टीने बुलेट ट्रेन व्यवस्थापनाने नियंत्रित प्रमाणात स्फोट घडवून आणण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या असून याबाबतचा आठवडाभराने आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

जलसार परिसरातील गावांमधील घरांच्या बोगदा उत्खननासाठी स्फोट घडवताना कंप जाणवत असून त्यामुळे अनेक घरांच्या भिंतीला व फरशीला तडे गेल्याची बातमी लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झाली. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी ग्रामस्थ, प्रकल्प राबवणारे अधिकारी व ठेकेदार तसेच महसूल अधिकारी त्यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला आमदार विलास तरे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व इतर अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत ग्रामस्थांनी मंजूर परवानगी पेक्षा अधिक शक्तिशाली स्फोट घडवून आणल्यामुळे नागरिकांना तसेच वन प्राण्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यामुळे घरांना तडे गेल्याची माहिती दिली. स्फोट घडवताना आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आणून शासनाने दिलेल्या परवानगीचे उल्लंघन होत असल्याची तक्रार या बैठकीत करण्यात आली.

जिल्हाधिकारी यांनी याबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेऊन बोगदा उत्खननासाठी स्फोट दिवसा घेण्यात यावे, मंजूर असणाऱ्या परवानगी अनुरूप स्फोट करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला दिल्या. बोगदा घडण्यासाठी स्फोट घडवताना चार संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे सांगत या शासकीय अधिकाऱ्यांकडून स्फोटाच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवावे असे सुचित करण्यात आले. तसेच ग्रामस्थांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बोगद्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रवेश करू नये असेही त्यांना या बैठकीत समज देण्यात आली.

जिल्हाधिकारी यांच्या शुक्रवार (ता २१) बैठकीनंतर दोन दिवस नियंत्रित प्रमाणात स्फोट घडल्याने घरांना जाणवणारा कंप कमी प्रमाणात होता असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र या आठवड्याच्या आरंभी पासून पुन्हा शक्ति स्फोट आणल्याने घडून आणल्याने पुन्हा गावकऱ्यांना होणारा त्रास सुरू झाल्याचे माहिती ग्रामस्थांच्या मार्फत देण्यात आली. या प्रकरणात जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्याशी संपर्क साधला असता या संदर्भात काही दिवसांनी आढावा बैठक घेतल्यानंतर स्फोट नियंत्रित पद्धतीने घडवून आणण्याबाबत पुन्हा संबंधितांशी विचार विनिमय केला जाईल असे त्यांनी लोकसत्ता ला सांगितले.

नुकसान भरपाईचे सर्वेक्षण सुरू

जलसार व परिसरातील काही गावांमधील सुमारे २०० घरांना तडा गेल्याचा प्राथमिक अंदाज असून रिहॅब प्रायव्हेट लिमिटेड या त्रयस्थ संस्थेमार्फत त्याचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. हे प्राथमिक सर्वेक्षण आठवडाभरात संपण्याचे अपेक्षित असून त्यानंतर सुमारे १५ दिवसात नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात येईल असे एल अँड टी कंपनी मार्फत ग्रामस्थांना आश्वासन देण्यात आले.

“नियंत्रित स्फोटकांसाठी वापरल्या जाणाऱ्या स्फोटकांचे प्रमाण खडकांच्या थर आणि भू-तांत्रिक तपासणीच्या आधारे निश्चित केले जाते.

सर्व स्फोटके केवळ त्या ठिकाणी प्रशिक्षित आणि प्रमाणित ‘ब्लास्टर’ द्वारे हाताळली जातात.

नियंत्रित स्फोट घडवावेत – गावकऱ्यांची मागणी

गेल्या आठवड्यात संपूर्ण परिसर हादरवून सोडणारा स्फोट घडल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक झाली. यावेळी आगामी आठवड्याभरात गावकऱ्यांना विश्वासात घेऊन बोगदा खणण्यासाठी स्फोट घडवले जात आहेत. गावातील तेजस पाटील या तरुणांनी बोगदा खाण्याच्या ठिकाणी स्वतः उभे राहून या प्रक्रियेत स्फोटकांचे वजन लक्षात घेऊन काही निरीक्षणा केली.

तीन मीटर खोली वर छिद्र करून २५० किलो स्फोटके वापरल्यास परिसरात मोठ्या प्रमाणात कम्प जाणवला. मात्र तीन मीटर खोली छिद्र करून २०० किलो स्फोटके वापरल्यास बोगदा खंडाच्या क्रियेत अपेक्षित खूप काम होत नसल्याचे तज्ञांचे मत झाल्याचे तेजस पाटील यांनी लोकसत्ताला सांगितले. मात्र स्फोटानंतर कंपन (व्हायब्रेशन) मोजमाप करणाऱ्या यंत्रामध्ये दोष असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असून फक्त तंत्रज्ञानावर विश्वास न ठेवता प्रत्यक्षात होणाऱ्या कंपनी अभ्यासले गेले पाहिजे असे गावकऱ्यांचे मत आहे.

त्यामुळे जलर येथील बोगद्याचे काम त्या वेळेत पूर्ण करण्यासाठी मध्य मार्ग शोधणे आवश्यक झाले असून कंपनामुळे बाधित होणाऱ्या घरांची पुन्हा नव्याने बांधून करून द्यायचे आश्वासन संबंधित कंपनीने गावकऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्या समक्ष लिहून द्यायला पाहिजे असे मत गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या, जिल्हा प्रशासनाशी झालेल्या चर्चेनुसार, जिल्हा अधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत नियंत्रित स्फोटकांचे काम केले जात आहे.” – प्रवक्ता, बुलेट ट्रेन प्रकल्प