चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार
नीरज राऊत
पालघर : पालघर जिल्ह्यत आदिवासी प्रकल्पांतर्गत कातकरी समाजाच्या बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांच्याकरिता वीटभट्टय़ांची योजना राबवण्यात आली होती. या योजनेंतर्गत सहा बचत गटांच्या प्रकल्पांना विम्याचे संरक्षण देण्यात आल्यामुळे चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची भरपाई या बचत गटांना मिळणार आहे.
आदिवासी बांधवांचे व विशेषत: कातकरी समाजबांधवांचे रोजगाराच्या शोधात स्थलांतर होत असून यापैकी अधिक तर स्थलांतरित कामगार वीटभट्टय़ांवर काम करत असल्याचे दिसून आले आहे. या अनुषंगाने डहाणू आदिवासी प्रकल्प यांनी कातकरी बांधवांचे सात बचत गट तयार करून त्याला दहा लाखापर्यंतचे अर्थसहाय्य देऊन वीट उत्पादन व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले.
पालघर, डहाणू व तलासरी तालुक्यात विशेष घटक योजनेतून देण्यात आलेल्या अर्थ सहाय्यातून या बचतगटांना टप्पानिहाय मदत करण्यात आली. त्याचबरोबरीने वीटभट्टी उभारताना लागणाऱ्या कच्चा मालाची खरेदी करण्यासाठी बचत गटातील वेगवेगळ्या सभासदाला संधी देण्यात आली.
या वीट भट्टय़ांच्या उभारणी दरम्यान या कामगारांना रोजगार मिळण्याच्या बरोबरीने विटांची विक्री केल्याने नफ्यात देखील हे सभासद भागीदार ठरले. यामुळे किमान ७० कुटुंबीयांचे स्थलांतर रोखण्यात आल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. गेल्या काही वर्षांंपासून मे महिन्यात येणाऱ्या पूर्व मोसमी पावसाच्या सरी किंवा चक्रीवादळ, अवकाळी पाऊस यांमुळे वीटभट्टय़ांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर कातकरी बचत गटांच्या सहा वीट भट्टय़ांना विमा संरक्षण देण्यात आले होते. मे महिन्याच्या मध्यावर झालेल्या चक्रीवादळामुळे या वीटभट्टय़ांचे देखील नुकसान झाले असता त्यांना विमा संरक्षणातून अर्थसहाय्य मिळणार असल्याची माहिती डहाणू प्रकल्प कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या बचतगटाने या हंगामात प्रत्येकी किमान चार लाख विटांचे उत्पादन केल्याचा प्राथमिक अंदाज असून आगामी काळात ते स्वयम् या भट्टय़ा उभारण्यास सक्षम करण्याचा प्रयत्न या अभिनव प्रकल्पाची करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
महिलांचा वीट उत्पादन गट
वीट उत्पादनात सक्रिय असणाऱ्या सात कातकरी बचत गटांपैकी तलासरी तालुक्यातील वसा येथील एका महिला बचत गटाचा समावेश आहे. या बचत गटाने पुरुषांच्या तुलनेत उत्पादन कमी प्रमाणात घेतले असले तरी आदिवासी महिलांसमोर व्यवसायात पदार्पणाचा आदर्श निर्माण केला आहे.
माती पुनर्वापराचा प्रश्न
चक्रीवादळादरम्यान झालेल्या पावसामध्ये मातीच्या तयार केलेल्या कच्च्या विटांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. असे असले तरी या मातीचा पुनर्वापर करता येईल येईल अशी भूमिका विमा कंपनीने घेतले असून या पावसात भिजलेल्या मातीचा मोबदला बचत गटांना द्यायचा किंवा नाही याबाबत निर्णय प्रलंबित असल्याने विमा रक्कम देण्याचे काम प्रलंबित असल्याचे समजते.