पालघर : जांभूळ फळांच्या माध्यमातून दरवर्षी चार ते पाच कोटींची उलाढाल करणारे जांभूळ गाव बहाडोली अडचणीत सापडले आहे. फळ काढणीचा हंगाम लांबल्याने व कडक उन्हामुळे बहुतांश जांभळाच्या झाडांची मोहोर फुले करपल्याने जांभूळ उत्पादक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. 

पालघर तालुक्यात वैतरणा नदीच्या काठावर बहाडोली व इतर गावे वसलेली आहेत.  दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात जांभळाच्या काढणीचा व विक्रीचा हंगाम सुरू होतो.  निसर्गाच्या लहरीपणामुळे या वर्षी अजूनपर्यंत जांभुळ फळाच्या काढणीचा हंगाम सुरू झालेला नाही. ज्या झाडांना फळे आलेली आहेत अशा झाडांची सुमारे वीस टक्के इतकीच फळे काढणी झालेली आहे. बहाडोली व इतर गावांमध्ये पाच हजारांहून अधिक जांभूळ फळझाडे आहेत.   एका झाडापासून ४० ते ६० हजारांपर्यंतचे उत्पन्न जांभूळ उत्पादकांना प्राप्त होते.  पावसाळा तोंडावर असल्यामुळे हे पीक वाया जाणार असल्याची चिंता येथील जांभूळ उत्पादकांना आहे. काही झाडांना फळे आली असली तरी ती परिपक्व नाहीत. अशातच पाऊस पडला तर संपूर्ण पीक वाया जाईल व मोठे आर्थिक नुकसान होईल अशी भीती व्यक्त होत आहे

खर्च वाया जाण्याची भीती

जांभळाच्या झाडाला मोहोराच्या काळापासून फळ तयार होईपर्यंत तीन ते चार वेळा कीटकनाशके आणि औषध फवारणी करावी लागते. तयार जांभूळ झाडांच्या फांद्यांमधून अलगदपणे काढण्यासाठी झाडाच्या चारही बाजूंनी बांबूंची परांची बांधणे आणि फळ काढणीसाठी मनुष्यबळाचा वापर करावा लागतो. केलेला खर्च तरी सुटतो की नाही अशा विवंचनेत शेतकरी वर्ग आहे.

एका झाडापासून ८० हजारांचे उत्पन्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बहाडोली गावच्या १९० हेक्टर क्षेत्रापैकी ६० हेक्टर क्षेत्रात सहा हजार जांभळाच्या झाडांची लागवड आहे. एका झाडापासून पाचशे ते आठशे किलो जांभळाच्या फळांचे उत्पादन मिळते. सुरुवातीला हजार ते बाराशे रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने जांभळाच्या एका झाडामागे शेतकऱ्यांना पन्नास हजारांपासून ऐंशी हजारांच्या घरात उत्पन्न मिळते. त्यामुळे बहाडोली-खामलोली भागातील पारंपरिक भातशेती करणारे अनेक शेतकरी जांभूळ शेतीकडे वळले आहेत.