पालघर : केळवा रोड बंधारा धरणातून जाणारी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन मायखोप गावात फुटल्यामुळे आजूबाजूच्या परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या गावातील पाईपलाईन जीर्ण झाली असून अनेक वेळा ती फुटण्याचे प्रकार घडत असल्याने या गावातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तर पंचायत समिती याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

आज सकाळी सहाच्या सुमारास केळवे रोड बंधारा धरणातुन जाणारी पाईप लाईन मायखोप गावात फुटली. केळवा, मायखोप व माकुणसार मार्गाने दातिवरे पर्यंत या धरणातुन पाणी पुरवठा होतो. पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन ही जवळपास 40 वर्षे जुनी ३०० मिलिमीटर व्यासाची असून जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे सतत कुठे ना कुठे फुटून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असते. त्यामुळे नेहमीच या गावातील नागरिकांना दोन ते तीन दिवस पाण्याच्या टंचाईसह पाणी साचणाऱ्या प्रकाराला सामोरे जावे लागत आहे. परंतु पाणी पुरवठा विभागाकडून पाईपलाईनचे व्यवस्थित नियोजन देखभाल होत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

मायखोप येथील रहिवासी संजय पाटील यांच्या घराजवळ आज सकाळी पाईप तुटल्यामुळे घर बांधण्यासाठी ठेवलेल्या जवळपास 5000 रुपये किमतीची रेती वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे ती रेती वाहून गेली असून पंचायत समिती व पाणीपुरवठा विभागाने याची नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत गावकऱ्यांनी पाईपलाईनचे काम करणाऱ्या कामगारांना विचारणा केली असता पाईपलाईन ४० ते ४५ वर्षे जुनी असल्याने जीर्ण झाली असून याचे सुटे भाग उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ही पूर्ण पाईपलाईन बदलणे हाच एक यावर उपाय असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत माहीम गावचे सरपंच महेंद्र किनी यांच्याशी संपर्क साधला असता या धरणातून आजूबाजूच्या गावांमध्ये पाणीपुरवठा होत असून बाईची अवस्था खराब झाली आहे. याबाबत पंचायत समिती कडे अनेकदा निवेदन देखील करण्यात आले आहे.

पाणी वाहणाऱ्या भागात कुडाचे घर झोपडी असेल तर पाणी घरात घुसल्याने राहणे मुश्कील होते. रेती वाहुन गेल्याने घर बाधकाम कामात अडथळा निर्माण झाला आहे. संबंधित अधिकारी यांना विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. जलजीवन कामात होत असणाऱ्या दिरगाई मुळे जुना पाईप लाईन दुरुस्तीत आर्थिक नुकसान होते. अशा दुर्घटनातुन निर्माण होणारे नुकसान कसे भरुन काढावे. संजय पाटील मायखोप रहिवासी