नीरज राऊत
साहित्याच्या मूठभर विचाराने एखाद्या व्यक्तीचे आयुष्य बदलू शकते असे अनेकदा अनुभव आले आहेत. साहित्य चळवळ पालघर जिल्ह्यातील ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कोकण मराठी साहित्य परिषदेने सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने केला. या दोन दिवसीय संमेलनात अनेक साहित्यिक व नामवंतांनी उपस्थिती दर्शवल्याने पालघरवासीयांसाठी साहित्य पर्वणी ठरली…
शहरांमध्ये साहित्य संमेलन भरविण्याऐवजी ग्रामीण भागात कोमसापचे महिला संमेलन घ्यावे या दृष्टीने दोन वर्षांपासून हे संमेलन जव्हार, मोखाडा भागात आयोजित करण्याबाबत चाचपणी सुरू होती. मात्र करोना संक्रमणामुळे संमेलन भरवणे शक्य होऊ शकले नव्हते. संमेलन भरवण्याचा निर्णय झाला तोपर्यंत पावसाळा जवळ आल्याने पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात हे संमेलन आयोजित करण्यात आले. संमेलनाच्या पहिल्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली तरीही वाडा, जव्हार, विक्रमगड, डहाणू व तलासरी भागातील तसेच मुंबई-ठाणे-नवी मुंबईसह कोकणातील साहित्यप्रेमींनी या संमेलनात सहभाग घेतला.
स्वतंत्र महिला संमेलनाची गरज अजूनही भासत आहे का? याविषयी चर्चा संमेलनातील जवळपास प्रत्येक चर्चासत्रात कमी-अधिक प्रमाणात झाली. महिलांना साहित्यक्षेत्रात पुरेशा प्रमाणात प्रतिनिधित्व मिळत नाही, महिला साहित्यिकांच्या निर्मितीचे साधारणत: ३० टक्के वाचन केले जाते, साहित्याची दिंडी ग्रामीणभागांत अजूनही पुरेशा प्रमाणात पोहोचलेली नाही, महिलांना साहित्य निर्मितीसाठी पुरेसा वेळ मिळाला पाहिजे, त्यांना याकामी अधिक सहकार्य मिळाले पाहिजे, तसेच महिलांचे साहित्य सहजपणे उपलब्ध व्हावे यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न व्हावेत असे अनेक विचार या संमेलनात वेगवेगळय़ा सत्रांमध्ये व्यक्त करण्यात आले.
एकीकडे सध्याच्या महिला वेगवेगळय़ा क्षेत्रांत आपला नावलौकिक प्रस्थापित करत असताना अजूनही काही टीव्ही मालिकांमधून महिलांवर होणारा काळबाह्य अन्याय दाखवला जात असून अशा मालिका आवडीने पाहिल्या जातात याची खंत व्यक्त करण्यात आली. साहित्यिक ‘तो’ आणि ‘ती’ यांच्यात कोणत्याही प्रकारचा फरक नसून साहित्य क्षेत्रामध्ये लिंग समानता आणण्याची गरज आहे, असे यावेळी मतप्रदर्शन करण्यात आले. पीडित व सोशीक महिलांचे गाऱ्हाणे साहित्यामधून मांडण्याऐवजी मोकळय़ा आकाशात भरारी घेणाऱ्या तसेच समाजातील अनिष्ट रूढी, परंपरांविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वावर कविता किंवा साहित्य लिखाण करावे असे विचार प्रखरपणे मांडण्यात आले.
कोविडपश्चात महिला साहित्यिकांमध्ये काय सुरू आहे व साहित्यक्षेत्रात अलीकडच्या काही वर्षांत झालेल्या वेगवेगळय़ा पैलूंच्या लिखाणांबाबत चर्चा करण्यात आली. अशी संमेलने, चर्चासत्र वारंवार आयोजित करत राहणे, महिलांमध्ये मैत्रीचे अधिक घट्ट संबंध प्रस्थापित करणे, महिलांनी एकमेकांच्या लिखाणाबद्दल प्रशंसा करणे, प्रोत्साहन देणे, साहित्य प्रसिद्धीसाठी प्रकाशकांनी लेखकांपर्यंत पोहोचावे याकरिता दर्जेदार, सर्जनशील लेखन कसे करावे याबाबत विचारमंथन या संमेलनात झाले. महिलांसाठी राजकीय क्षेत्रात आरक्षण असतानादेखील चारित्र्यहनन व पैशाचा वापर करण्याच्या प्रवृत्तीमुळे महिला स्वत: राजकीय क्षेत्राकडे जाण्यास अनुकूल नाहीत. साहित्यिकांनी महिलांना राजकारणात येण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील महिलांचे अनुभव कथन करावे असेही सुचविण्यात आले.
समाजमाध्यमाने साहित्याची व्याख्या लवचीक केली असली तरीही अभिजात साहित्य म्हणजे काय हे विसरून जाऊ नये असा संदेश देऊन समाजमाध्यमांनी जागतिक पातळीवरील माणूस जवळ आणला आहे, हे विसरून चालणार नाही. या माध्यमातून विचारमंथन, चर्चा घडविण्यासाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. अशा परिस्थितीत आपले लेखन प्रकाशित होऊन ते वाचकांपर्यंत पोहोचावे यासाठी लेखकांना वाट पाहावी लागत आहे. सर्जनशील लेखनासाठी जी वैचारिक बैठक, चिकाटी व चिंतनाची गरज लागते ती सध्या काही लेखकांना नकोशी झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली. अलीकडच्या काळातील साहित्यिकांकडून निर्मित होणारे लिखाण सत्त्वशील आहे की ‘फॉरवर्ड’करण्यासाठी निर्मित झाले आहे, याचे चिंतन होऊन समाजमाध्यमांवर मिळणाऱ्या झटपट ‘लाइक’च्या आहारी साहित्यिकांनी न जाता अभिजात साहित्याची व्याख्या विसरून जाऊ नये, असे विचार मांडण्यात आले.
समाजमाध्यमांवर लिखाण करणाऱ्या मंडळींनी जणू आपणच संपादक आहोत असे गृहीत धरून आपल्या लिखाणाची तपासणी, पडताळणी करावी व आवश्यकता भासल्यास पुनर्लेखन करायला हवे असे विचारदेखील मांडण्यात आले. महिलांच्या लिखाणाबाबत पूर्वग्रहाने अजूनही पाहिले जात असून ही परिस्थिती बदलण्यासाठी महिलांच्या लेखनाची व्यापक प्रमाणात चर्चा करायला हवी, असे मत या संमेलनात मांडण्यात आले.रेंगाळलेल्या उद्घाटन सोहळय़ानंतर संमेलनातील सत्रांमध्ये ठसा उमटवणाऱ्या आत्मनिर्भर स्त्रियांचे अनुभव कथन सोबत ‘स्त्री साहित्यिकांच्या बदलत्या दिशा’ या परिसंवादात अलीकडच्या काळातील महिला साहित्याचा आढावा घेण्यात आला. राजकीय क्षेत्रातील महिलांच्या परिसंवादाला अनेक मान्यवर उपस्थित नसतानादेखील महिला सक्षमीकरण या विषयावर आयोजित चर्चासत्रामध्ये अनेक ज्वलंत मुद्दय़ावर ऊहापोह झाला.
ग्रामीण भागांतील श्रोत्यांवर साहित्याचा भडिमार नको म्हणून कलादालन, प्रसिद्ध कवितांवर पदन्यास तसेच विस्मृतीत जाणार या लोककलांचा उजाळा देणारा लोकरंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्थानिक संस्कृतीचे वैभव दर्शन देणारा लोक संस्कृती कार्यक्रमालादेखील रसिकांनी उत्तम प्रतिसाद लाभला. कवयित्री कट्टय़ामध्ये ११० पेक्षा अधिक कवयित्रींनी भाग घेऊन ग्रामीण भागातील महिलांमध्ये साहित्य आवडीचे दर्शन घडविले.
पालघरमध्ये स्वतंत्र साहित्य भवन लाभणार का? महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार? महिलांना साहित्य क्षेत्रात क्रियाशील करण्यात संपादक कमी पडत आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. आपण आपल्या मनातील सर्जनाची दारे सतत उघडी ठेवून जगातील विचार, प्रश्नांची मुक्त वारे तितक्याच मुक्तपणे खेळत ठेवावीत, असे विचार मांडण्यात आले. साहित्य इतिहासाच्या उजळणीबरोबरच विचार मंथन आणि मनोरंजन करणाऱ्या या साहित्य संमेलनाने शहरी- ग्रामीण, उच्च विद्याविभूषित ते किमान अक्षर ओळख असलेल्या महिलांना एकाच व्यासपीठावर स्थान मिळवून देणाऱ्या या संमेलनाला भव्यता प्राप्त झाली. बऱ्याच काळानंतर मोठय़ा स्वरूपात आयोजित या साहित्य संमेलनात जिल्ह्यातील साहित्यप्रेमींनी आनंद घेतला.