scorecardresearch

राख प्रकल्पात स्थानिक दुर्लक्षित, पर्यावरणाला धोका; शेती, बागायतींवर दुष्परिणाम

दुसरीकडे पर्यावरणाला  धोका पोहोचत असून शेती, बागायतींवर होणाऱ्या परिणामांकडे  दुर्लक्ष झाले आहे. 

ash project adani grp contract

नीरज राऊत

पालघर:  अदानी इलेक्ट्रिसिटी,  मुंबई कंपनीच्या डहाणू औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून निर्मित होणाऱ्या राखेच्या विक्रीतून राजकीय क्षेत्रातील मंडळी मलिदा लाटत असताना राख साठवण्यासाठी ज्यांनी जमीन संपादित केली त्या स्थानिकांना या प्रकल्पामुळे  विशेष कोणताही लाभ मिळाला नसल्याचे दिसून येते.  दुसरीकडे पर्यावरणाला  धोका पोहोचत असून शेती, बागायतींवर होणाऱ्या परिणामांकडे  दुर्लक्ष झाले आहे. 

आसनगाव, चंडीगावच्या जवळपास सुमारे १०० एकर जमिनीवर असलेल्या खाजण जमिनीत राखेचे पॉण्ड (साठवण्याचे ठिकाण)   करण्यात आले आहेत. चार मोठय़ा आकाराच्या या पॉण्डपैकी तीन पॉण्डमध्ये पाण्याच्या मिश्रणात सोबत राख आणून सोडली जाते. तर एका ठिकाणी खाडी क्षेत्र वेढल्याने त्या ठिकाणी अजूनही झाडे, झुडपांची लागवड आहे.

पॉण्डमध्ये साठविलेली राख दमट ठेवण्याचे अपेक्षित असले तरीही काही प्रमाणात राख परिसरात हवे सोबत उडताना (पसरताना) दिसते. त्यामुळे आसनगाव व परिसरातील झाडांच्या पानावर राखेचा थर साचल्याचे दिसून येते. त्या परिसरात असलेली शेती जवळपास संपुष्टात आली असून ताड, आंबा, चिंच, रांजण इत्यादी झाडांची अपेक्षित वाढ होत नसल्याचे तसेच या झाडाला गेल्या अनेक वर्षांपासून फूल-फळ येत नसल्याचे स्थानिक गावकऱ्यांचे म्हणणे आहे. राख साठवण्याच्या जागेत काही स्थानिक मंडळींची जमीन तुटपुंजा मोबदला देऊन अधिग्रहित करण्यात आली होती असा आरोप देखील करण्यात येत असून या मंडळींपैकी कोणाला नोकरी किंवा व्यवसायात सामावून घेतले नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. राखेच्या वाहतुकी दरम्यान खराब होणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी ३० रुपये प्रति टन इतकी शुल्क आकारणी गेल्या फेब्रुवारीपासून करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात रस्त्याच्या कोणत्याही प्रकारची दुरुस्ती कंपनीतर्फे करण्यात आली नसल्याचे स्थानिक वाहतूकदारांचे म्हणणे आहे. राख वाहतूक बंद करून हे शुल्क १३० ते २०० रुपये प्रति टन इतके वाढवून त्यातील मोठा वाटा काही राजकीय मंडळींना वितरित करण्याचे विचाराधीन असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. या राख वाहतुकीच्या व्यवसायात राजकीय वरदस्त असलेल्या मंडळींचा दबदबा असून स्थानिक मात्र उपेक्षित राहिले असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी नाही

सातत्याने तलावातील राख उचलल्याने खड्डय़ातील खोली वाढल्याचे तसेच या तलावांभोवती असणारे बंधार ढासळण्याच्या स्थितीत असल्याचे कारण पुढे करून राख वाहतूक बंद करण्यात आल्याचे अदानी कंपनीतर्फे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते. २३ जानेवारी रोजी प्रकल्पाची पाहणी करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत तोंडी सूचित करण्यात आले होते, मात्र या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कोणतीही लेखी सूचना प्राप्त नसल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी वीरेंद्र सिंग यांनी लोकसत्ताला सांगितले. याबाबत वृत्तपत्रांमधील बातम्यांची दाखल घेऊन आपण या ठिकाणाची पाहणी करू असे त्यांनी पुढे सांगितले. 

प्रदूषण कार्यालयासमोर आंदोलन

राख साठवणाऱ्या तलावाची तसेच लगतच्या बंधाऱ्याची दुरवस्था झाली असताना त्याची जबाबदारी औष्णिक ऊर्जा प्रकल्पाची असून या कंपनीने दाखविलेल्या हलगर्जीपणाविरुद्ध प्रदूषण नियंत्रण मंडळांनी कारवाई करावी, अशी  मागणी वाहतूकदारांच्या संघटनेने केली आहे. शिवाय राखसोबत मातीची चोरी झाली असल्याचा संशय व्यक्त करून राख वाहतूक अचानकपणे बंद केल्याने वीट निर्मिती उद्योगात मातीचा अतिरिक्त वापर होत असल्याकडे लक्ष वेधले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बोटचेपी भूमिकेविरुद्ध वाहतूकदाराने ९ फेब्रुवारीपासून कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या