पालघर जिल्ह्य़ात ४५ हजार मजुरांना लाभ

पालघर: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्यांना मजुरांसाठी मध्यान्ह भोजन योजना पालघर जिल्ह्यातही सुरू करण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ विक्रमगड तालुक्यातील आलोंडे येथे झाला. या योजनेचा जिल्ह्यातील सुमारे ४५ हजार कामगारांना लाभ मिळणार आहे. योजना जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने सर्वत्र राबविण्यात येणार आहे.   

इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम १९९६ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ पुनर्गठित करण्यात आले असून डिसेंबर २०२० पासून मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ११ बांधकाम प्रकल्पांवरील १५५९ मजुरांना दोन वेळचे जेवण देण्यात येत आहे. या जेवणासाठी पूर्वी पाच रुपये इतके शुल्क आकारणी करण्यात येत असे, मात्र करोनाकाळापासून हे जेवण विनामूल्य देण्यात येत असून कल्याणकारी मंडळाच्या नोंदीत असणाऱ्या व  नसणाऱ्या मजुरांना याचा लाभ दिला जात आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड व रोपवाटिका ही कामे वगळून हाती घेण्यात येणाऱ्या विविध कामांचा अंतर्भाव या योजनेत असून अशा मजुरांना या योजनेत सहभागी करण्यात येणार आहे. योजना सध्या विक्रमगड तालुक्यातील आलोंडे परिसरातील ११५० मजुरांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. योजना जिल्ह्यात सर्वत्र राबवली जाणार असल्याचे कामगार उपायुक्त किशोर दहिफळकर यांनी सांगितले.   कार्यक्रमाला आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, उपजिल्हाधिकारी (रोहियो) सुरेंद्र नवल, कामगार उपायुक्त किशोर दहिफळकर आदी उपस्थित होते.

स्थलांतरावर रोख 

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मजूर ऑक्टोबर महिन्यापासून मोठय़ा प्रमाणात रोजगाराच्या शोधात शहरी भागात स्थलांतरित होत असतात.  रोहियो मजुरांना मध्यान्ह भोजन उपलब्ध झाल्याने स्थलांतराचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच स्थलांतरामुळे उद्भवणारे कुपोषण, बाल मृत्यू, माता मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात येईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

 कामगार विभाग खर्च करणार

सध्या जिल्ह्यात २३९ समूहांवर ११८६ कामांवर सुमारे ४५ हजार मजूर रोजगार हमीअंतर्गत काम करत आहेत. मध्यवर्ती स्वयंपाक घरातून सध्या या मजुरांना भोजन पुरवले जाणार असून प्रती भोजन ६७ रुपये इतका खर्च कामगार विभाग प्रत्येक भोजनावर करणार आहे.  या भोजनामध्ये दोन प्रकारचे जेवण असून त्यामध्ये पोळी (चपाती), भाजी, गूळ, चटणी, भात, डाळ यांचा समावेश आहे. 

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी

या मजुरांनी वर्षभरात ९० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केले आहे अशा कामगारांची नोंदणी मंडळाकडे जिल्ह्यातील प्रत्येक कामगार कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. नोंदणीचे नूतनीकरण देखील आवश्यक असून नोंदणीसाठी २५ रुपये शुल्क व दर महिना एक रुपया प्रमाणे वर्षांला बारा रुपये असे ३७ रुपयांचा शुल्क नोंदणीच्या वेळी भरणे आवश्यक आहे. नूतनीकरण करण्यासाठी १२ रुपये भरणे आवश्यक असून नोंदणीसाठी मालकाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक, शिधापत्रिका धारक, छायाचित्र इत्यादी कागदपत्र आवश्यक असून नोंदणीचे काम ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यात २० हजार १८८ मजुरांची नोंदणी झालेली असून त्यामध्ये १९९ मजूर रोजगार हमी योजनेत कामाला आहेत. उर्वरित ७६५ मजुरांचे अर्ज प्राप्त झाले असून मंडळामार्फत अकरा हजार ५१० मजुरांना यापूर्वी सहा कोटी तीन लाख ८९ हजार इतके अर्थसहाय्य देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर ७२२० मजुरांना आवश्यक सुरक्षा किटचे वाटप मंडळातर्फे करण्यात आले आहे.