|| पूनम सकपाळ

तेलासह अनेक आवश्यक जिन्नस महागल्याने गृहिणींचा हात आखडता; लाडूंचा खर्च किलोमागे १०० रुपयांनी जास्त

नवी मुंबई : करोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे यंदाची दिवाळी जल्लोषात साजरी करण्याचे बेत रचणाऱ्या कुटुंबांच्या उत्साहाला महागाईचे गालबोट लागले आहे. सततची इंधनदरवाढ, करोनाकाळातील उत्पादन-आवक यांच्यातील घट आणि अन्य कारणांमुळे दिवाळीतील विविध फराळी पदार्थांकरिता लागणारे जिन्नस गतवर्षीच्या तुलनेत महागले आहेत. त्यातच तेलाच्या दरांनी तर ५० टक्क्यांची उसळी घेतली आहे. या घटकांचा विचार करता, फराळ बनवण्यासाठी लागणाऱ्या खर्चात किलोमागे २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

‘लोकसत्ता’ने नवी मुंबईतील एपीएमसी बाजारातील घाऊक दरांसह मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई या शहरांतील किरकोळ बाजारांतील जिन्नसांच्या दरांचा आढावा घेतला असता, बहुतांश जिन्नसांमध्ये गेल्या दोन वर्षांत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. यातील काही टक्के वाढ ही वार्षिकदृष्ट्या क्रमप्राप्त असली तरी, सध्या इंधन दरवाढीमुळे वाढलेली महागाई, करोना टाळेबंदी तसेच अनियमित हवामान यांचाही दरांवर लक्षणीय प्रभाव पडल्याचे दिसून आले. फराळ बनवण्यासाठी लागणारे जिन्नस महागल्याने घरी फराळ बनवण्याचा खर्चही वाढला आहे.

करोनाच्या संकटामुळे गतवर्षीची दिवाळी अनेक घरांत सुनीसुनी गेली. साथीच्या दहशतीमुळे अनेक कुटुंबांनी दिवाळीतल्या फराळ बनवण्याच्या परंपरेला फाटा देत बाजारातील तयार फराळाची किरकोळ खरेदी करून सण साजरा केला. तर टाळेबंदीमुळे आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे गतवर्षी अनेकांसाठी गेल्या वर्षी दिवाळी साजरीच करता आली नाही. यंदा मात्र, करोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. तसेच शिथिलीकरणामुळे आर्थिक जीवनही पूर्वपदावर येऊ घातले आहे. त्यामुळे वर्षातील मोठा सण असलेल्या           दिवाळीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. अर्थात महागाईने या उत्साहावर काहीसे विरजण पाडले आहे.

दिवाळीतील लाडू, करंजा, चिवडा, चकल्या आदी फराळाचे पदार्थ बनवण्याची लगबग किमान दहा दिवस आधीपासून सुरू झाली आहे. मात्र, विविध जिन्नसांच्या वाढलेल्या दरांकडे पाहून गृहिणी मोजक्या आणि मर्यादित स्वरूपात फराळ बनवत आहेत. फराळांसाठी लागणाऱ्या रवा, साखर, बेसन, चणाडाळ, तांदूळ, मैदा यांच्या दरांत गतवर्षीच्या तुलनेत किलोमागे किमान २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याहून कहर म्हणजे, खाद्यतेलाचे भाव गेल्या काही महिन्यांपासून वाढले असून दिवाळसणात दरांनी आणखी उसळी घेतली आहे. घाऊक बाजारात पामतेल १२० रुपये किलो, सोयाबीन तेल १३०-१३५ रुपये, सूयफूल तेल १४० ते १७० रुपये या दरांनी विकले जात आहे. ‘२०१९च्या तुलनेत यंदा खाô तेलात ५०% दरवाढ झाली आहे. ६०% खाôतेल हे आखाती देशातून आयात होते. करोना काळात सर्वच बंद असल्याने कामगार कमी उत्पादनावर प्रक्रिया कमी होत होती,परिणामी खाô तेलाचा मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला होता म्हणून दरात वाढ झाली आहे,’ अशी माहिती व्यापारी अरुण जैन यांनी दिली. नामांकित कंपन्यांच्या तेल पाकिटांचे दर तर याहूनही अधिक आहेत.

 कोणताही फराळ बनवण्याकरिता तेल हा आवश्यक घटक असल्याने साहजिकच सर्वच फराळांच्या निर्मिती खर्चात वाढ झाली आहे. सन २०१९मध्ये  एक किलो दिवाळी फराळ बनविण्यासाठी किलोमागे साधारणत: ३०० ते ४००रुपये खर्च येत होता, परंतु, यंदा हा खर्च १०० ते २०० रुपयांनी वाढला आहे. रव्याचे एक किलो लाडू बनवण्यासाठी एकूण जिन्नसांचा खर्च विचार करता ५०० रुपये खर्च येत असून किलोभर चकलीसाठीही ५०० रुपयांची नोट मोडावी लागत आहे. फराळ तयार करण्यासाठी लागणाऱ्या जिन्नसाच्या दरात वाढ झाली असली तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा त्यांच्या मागणीत वाढ झाली असल्याचे ठाण्यातील किरकोळ विक्रेते जितेंद्र प्रजापती यांनी सांगितले. असे असले तरी, अनेक गृहिणींनी यंदाही कमी प्रमाणात फराळ बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सर्वच जिन्नस दुपटीने महाग झाले आहेत. मात्र, दिवाळी हा सण आपली परंपरा, संस्कृती जपणारा आहे. असे सण आपला उत्साह, मनोधैर्य वाढवत असतात. त्यामुळे महागाई वाढली असली तरी, गृहिणींना आपापल्या आर्थिक खर्चाचे गणित साधून मोजकेच पदार्थ करावे लागतील. ग्राहकांच्या उत्साहामुळे बाजारात आर्थिक उलाढाल वाढून त्याचा परिणाम देशाच्या आर्थिक स्थिती सुधारण्यातही होणार आहेच.

– प्राजक्ता पै-शहापूरकर, शेफ, मास्टर रेसिपीज