डहाणू : पोलीस दलात मनुष्यबळाच्या मंजूर पदांपैकी ५० टक्के पदे रिक्त असल्याने पोलीस चौक्या पोलिसांच्या प्रतीक्षेत आहेत. डहाणू नगर परिषद क्षेत्रात ६० हजार लोकसंख्या आहे. डहाणू पोलीस ठाण्यात १५० पोलिसांची आवश्यकता आहे, मात्र ही संख्या निम्म्यावर आहे. ग्रामीण पोलिसांना मनुष्यबळाची कुमक आजतागायत वाढवून मिळालेली नाही. मोजके दिवस वगळता वर्षभर सागरी चौक्या बंदच असतात. मनुष्यबळाची कमतरता असल्याचे डहाणूचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनाजी नलावडे यांनी सांगितले.

डहाणू किनारपट्टी संवेदनशील असताना सागरी पोलीस चौक्या मात्र दुर्लक्षित आहेत. चिखले, पारनाका, झाई या पोलीस चौक्या सुरू असताना डहाणू किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणात वाळू चोरी सुरूच आहे. तर नरपड पोलीस चौकी नेहमी बंदच असते. चिखले येथील तटरक्षक दलाचा प्रकल्प आहे.  डहाणू सागरी पोलिसांच्या तिन्ही गस्तीनौका २४ तास सज्ज राहिल्या पाहिजेत. २६/११ च्या निमित्ताने सीमा भागातील सागरी सुरक्षा सक्षम करण्याच्या दृष्टीने लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे सागरी मार्गात पोलीस बळ वाढवणे गरजेचे आहे. मात्र मंजूर पदांपेक्षा कमी जागा भरल्या जात आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यात रस्त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तथापि, येथील प्रमुख सागरी राज्य मार्गाचे चौपदरीकरण अजूनही झालेले नाही. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित राहत आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल करण्यात आले. मात्र सुरक्षा यंत्रणांनी केवळ शहरी भागांकडेच लक्ष केंद्रित केले असून आजही सागरी पोलीस ठाणी दुर्लक्षितच आहेत. त्यामुळे महाराष्ट्र गुजरात सीमेवरील तलासरी डहाणू पोलीस विभागातील पोलीस चौक्या सुसज्ज ठेवणे गरजेचे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

जवळजवळ सर्वच सागरी पोलीस चौक्या सुरू आहेत. मनुष्यबळाची कमतरता असल्याने आवश्यक वेळी पोलीस चौक्यांना मनुष्यबळ पुरवले जाते. कमतरता असल्याने सर्व ठिकाणी मनुष्यबळ पुरवता येत नाही, ही एक मोठी समस्या भेडसावत आहे.

धनाजी नलावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणू