बोईसर : मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर उपलब्ध न झाल्यामुळे गरोदर महिला आणि बाळाचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी चहाडे येथील अनिता वाघ हिला प्रसूतीसाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  नैसर्गिक प्रसूती होणे शक्य नसल्याने सिझेरियन प्रसूतीचा करण्याचा निर्णय झाला परंतु त्यासाठी डॉक्टर उपलब्ध नव्हते. रुग्णाला इतर रुग्णालयात  नेण्यास सांगितले. परंतु नातेवाईक महिलेला  घेऊन जाण्यास तयार नव्हते. त्यांचा नैसर्गिक प्रसूती करण्याचा आग्रह होता.

सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास महिलेच्या जिवाला धोका निर्माण झाला. त्यामुळे तिला एका खासगी रुग्णालयात नेले मात्र तेथे तिला दाखल करून घेतले नाही. त्यामुळे तिला रुग्णवाहिकेतून सिल्वासा येथील रुग्णालयात नेण्याचे ठरविण्यात आले. परंतु तत्पूर्वीच  तिचा मृत्यू  झाला होता, असे पतीचे म्हणणे आहे. मनोर ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेली महिला सात तास रुग्णालयात असतानाही तिच्यावर उपचार झाले नसल्याने   पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप  महिलेचा पती सुनील वाघ याने केला आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोर ग्रामीण रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू झाल्याप्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, व जिल्हा परिषद सदस्यांनी भेट देऊन पाहणी केली असता या रुग्णालयातील दोषी असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निश्चितच कारवाई करण्यात येईल, असा इशारा निकम यांनी दिला. याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय बोदडे यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.  दरम्यान, नुकताच नांदगावतर्फे मनोर गावातील एका बाळंत महिलेचा मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.तिच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केल्याने  शवविच्छेदन करण्यात आले होते.