मनोर ते अच्छाड मार्गावर वर्षभरात १२६ अपघात, ७४ जणांचा मृत्यू

विजय राऊत

कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या वर्षभरापासून अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे.  मनोर ते अच्छाड या साठ किलोमीटरच्या रस्त्यावर गेल्या वर्षभरामध्ये जवळपास १२६ अपघात झाले असून यामध्ये ७४ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर ४९ नागरिकांना अपंगत्व आले आहे.   मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण ते आच्छाड दरम्यान मेंढवन, चारोटी, धानिवरी, आंबोली, दापचरी, वडवली, वरवाडा, अच्छाड अशा ठिकाणी चुकीच्या पद्धतीची तीव्र वळणे, तीव्र उतारावरील वळणे, रस्ता दुभाजकाला ठेवलेले छेद  आहेत. त्यामुळे ही आठ ठिकाणे अपघातस्थळ म्हणून वाहतूक पोलिसांनी घोषित केली आहेत. या आठ ठिकाणी सर्वाधिक अपघात होत आहेत. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे देखभाल दुरुस्तीचे व टोल वसुलीचे काम आयआरबी या कंपनीकडे  आहे.   कंपनीकडे अपघात झाल्यानंतर आग विझवण्यासाठी स्वत:ची अग्निशमन यंत्रणा नाही. त्याचप्रमाणे अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी पुरेशी क्रेन व्यवस्था नाही. जखमींना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करता यावे यासाठी आवश्यक त्या प्रमाणात रुग्णवाहिका नाहीत. यामुळे अपघात झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक जणांचे मृत्यू झाले आहेत आणि होत आहेत.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण घाटाजवळ चुकीच्या पद्धतीचे वळण आहेत या वळणावर नवीन वाहन चालक आल्यानंतर त्याला या वाहनाचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले की वाहन सुरक्षा कठडय़ावर आदळते किंवा रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गीकेवर जाऊन जाते आणि अपघात होतात. चारोटी येथील उड्डाणपुलावर चुकीच्या पद्धतीचे वळण असल्यामुळे गुजरातकडून मुंबईकडे येणारी वाहने पुलावरून खाली पडण्याचेसुद्धा प्रकार घडलेले आहेत. आंबोली गावाजवळ हॉटेल आरफासमोर रस्त्याच्या दुभाजकाला छेद देऊन रस्ता ओलांडण्यासाठी जागा ठेवण्यात आलेली आहे. या ठिकाणी तीव्र उतार असल्याकारणाने रस्ता ओलांडताना अनेक जणांनी आपले प्राण या ठिकाणी गमावले आहेत. वास्तविक या ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी उड्डाण पुलाची आवश्यकता आहे.  येथे सूचना फलक लावणे आवश्यक आहे.

वाहनांच्या गती नियंत्रणात राहावी  आणि अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मोटारीसाठी ताशी ८० किलोमीटर तर मालवाहतूक वाहनांसाठी ताशी ६० किलोमीटरचा वेग निश्चित केलेला आहे. वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनावर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे निश्चित केलेल्या वेगापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणाऱ्या मोटारीसाठी दोन हजार रुपये तर मालवाहतूक वाहनावर चार हजार रुपये इतका दंड आकारण्यात येतो. प्रत्येक दिवशी साधारणपणे दीडशे ते एकशे साठपर्यंत वाहनावर दंडात्मक कारवाई केली जात आहे 

उपचार केंद्र नावापुरते

महामार्गावर अपघात झाल्यानंतर अपघातातील जखमींना प्राथमिक उपचार तातडीने मिळावेत यासाठी आयआरबी प्रशासनाने चारोटी टोल नाका प्राथमिक उपचार केंद्र सुरू केले आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून हे उपचार केंद्र फक्त नावापुरते आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कर्मचारीवर्ग उपलब्ध नाही त्यामुळे अपघातग्रस्त जखमींना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालय मनोर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी दाखल करावे लागते

महामार्गावरीलचे प्रमुख अपघात स्थळ आहेत त्या ठिकाणी मोठेमोठे सूचना फलक लावावेत त्याच प्रमाणे वाहनांचा वेग कमी व्हावा यासाठी महामार्गावर छोटे छोटे गतिरोधक पट्टे बनवावेत याबाबत आयआरबी  प्रशासनाशी पत्रव्यवहार करून  त्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आले आहेत. 

– सतीश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक , महामार्ग पोलीस चारोटी