पालघर: जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीपदांच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दोन पदे घेत जिल्हा परिषद सत्तेत सहभागी झाली आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी संख्याबळ नसताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलेल्या मदतीचे फलित झाले. हेच या निवडणुकीत दिसून आले आहे. इतर दोन विषयांच्या सभापतीपदांमध्ये एक भाजप तर दुसरे बहुजन विकास आघाडीला मिळाले आहे. 

समाजकल्याण समिती सभापतीपदासाठी मंगेश भोईर, मंदा घरट, राजेश मुकणे, मनीषा निमकर यांनी अर्ज दाखल केले होते. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी नीता पाटील, विनया पाटील, भावना विचारे, रोहिणी शेलार यांनी अर्ज दाखल केले होते. तर विषय समिती सभापतीपदासाठी संदेश ढोणे, रोहिणी शेलार, नीता पाटील, अरुण ठाकरे, संदीप पावडे अशा पाच सदस्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. परंतु काही सदस्यांनी अर्ज मागे घेतल्याने समाजकल्याण समिती सभापतीपदी मनीषा निमकर (बहुजन विकास आघाडी), महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी रोहिणी शेलार (राष्ट्रवादी काँग्रेस) तर विषय समिती सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदेश ढोणे (बांधकाम) आणि भाजपचे संदीप पावडे (कृषी, पशुसंवर्धन) यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी जाहीर केले.

विषय समिती सभापतीपदाची निवडणूक टाळण्यासाठी तसेच जिल्हा परिषदेमध्ये अधिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयाचा आपण आदर करत तो निर्णय स्वीकारल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी निवडणुकीनंतर सांगितले. मात्र मुख्यमंत्री यांच्या निर्णयामुळे पक्षांतर करून आलेल्या अनेक सदस्यांमधील नाराजी या वेळी स्पष्टपणे दिसून आली.

मदतीचा मोबदला

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक सर्वप्रथम पुढे आली असता त्या वेळी शिंदे गटाकडे पुरेसे संख्याबळ नव्हते. शिवाय त्याप्रसंगी भाजपकडे शिंदे गटापेक्षा अधिक सदस्यसंख्या असल्याने त्यांनी अध्यक्षपदावर दावा केला होता. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेच्या चार सदस्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. शिवाय मुख्यमंत्री यांना अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मदत करण्याचे आश्वासन राष्ट्रवादीमधील एका गटाने दिले होते. या निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या गटाने त्यांच्याकडे असलेल्या सदस्यांना मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द केले होते, तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभाग न घेतल्याने अध्यक्षपदासाठी एकनाथ शिंदे गटाचे प्रकाश निकम सहजपणे विराजमान होऊ शकले होते. शिंदे गटाकडे संख्याबळ कमी असताना राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेले आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाळत त्यांच्या वाटेला आलेली दोन्ही सभापतीपदे राष्ट्रवादी काँग्रेसला दिली.  बहुजन विकास आघाडी आणि भाजपकडे सभापतीपद देण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या बाळासाहेबांची शिवसेना व भाजप यांच्या सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन विकास आघाडीने सहभाग घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा व गटनेत्या रोहिणी शेलार यांनी वेगवेगळे पक्षादेश काढले होते. तर सभापती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या गटनेत्या रोहिणी शेलार यांनी स्वतंत्र पक्षादेश काढून राष्ट्रवादीप्रमाणेच भाजप व बहुजन विकास आघाडीच्या सदस्यांना मतदान करण्याच्या सूचना दिल्या होत्या. १३ सदस्यांपैकी काशिनाथ चौधरी, सुनीता धूम व अक्षता चौधरी या तीन सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग न घेता शिंदे गट व भाजप यांच्या सत्तेत सहभागी होण्यास असहमती दर्शवली. 

भाजप आणि शिंदे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाण्याचा संबंध नाही.  विषय समिती सभापती निवडीवेळी गैरहजर राहण्याचा व्हीप मी बजावला होता. मात्र गटनेत्या रोहिणी शेलार आणि संदेश ढोणे यांनी आणि काही सदस्यांनी पक्षादेशाचे उल्लंघन केले आहे. याबाबत वरिष्ठांना कल्पना दिली आहे.  जिल्हा प्रभारी जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाला जुमानले नसल्याने त्यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सुनील चंद्रकांत भुसारा, आमदार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, पालघर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.