scorecardresearch

भूमापन आता जलदगतीने ; पालघर जिल्ह्यात ‘रोव्हर’ यंत्रणेचा वापर, वसई, डहाणूत केंद्रांची उभारणी

वैश्विक स्थान निश्चिती अर्थात ग्लोबल पोझिशिनग सिस्टम (जीपीएस) चा वापर करून अल्पावधीत विनाप्रक्रिया भूमापन करण्यासाठी रोव्हर पद्धत आहे.

भूमापन आता जलदगतीने ; पालघर जिल्ह्यात ‘रोव्हर’ यंत्रणेचा वापर, वसई, डहाणूत केंद्रांची उभारणी

पालघर : जमीन मोजणीसाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन  ((ETS) या पद्धतीच्या सोबतीने जिल्ह्यात नव्याने रोव्हर यंत्रणेचा वापर करून निरंतर संच संदर्भ केंद्राच्या आधारावर जमीन मोजणीची नवीन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वेगवेगळय़ा प्रकल्पांसाठी  होणाऱ्या भूसंपादनाला गती मिळणार आहे. डहाणू, वसईत केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.

राज्यात ७७ ठिकाणी निरंतर संचलन संदर्भ केंद्रे उभारण्यात आली आहेत. एकमेकांपासून साधारणपणे ७० किलोमीटर अंतरावर ही केंद्रे कार्यान्वित होण्याच्या टप्प्यात आहेत. पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने दिवसाला जेमतेम एका ठिकाणी जमिनीची मोजणी होत असे व त्यात उंच झाडी अथवा पिके गवत असल्यास अडचणी व मर्यादा येत असत. रोव्हर पद्धतीमुळे अडचणींवर मात होणार असून दिवसाला तीन किंवा त्यापेक्षा अधिक ठिकाणी जमिनीची मोजणी करणे शक्य असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, पालघर महेश इंगळे यांनी सांगितले आहे. वैश्विक स्थान निश्चिती अर्थात ग्लोबल पोझिशिनग सिस्टम (जीपीएस) चा वापर करून अल्पावधीत विनाप्रक्रिया भूमापन करण्यासाठी रोव्हर पद्धत आहे. निरंतर संचलन संदर्भ केंद्र अर्थात कंटिन्यूअस ऑपरेटिंग रेफरन्स स्टेशन  (उडफर) हे भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्या नियंत्रणाखाली जिल्ह्यातील वसई तालुक्यात मालोंडे व डहाणू तालुक्यात कासा येथे उभारण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरीय उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला प्रत्येकी एक रोव्हर देण्यात आले असून याकरिता भूमापन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पद्धतीमध्ये प्रत्यक्षात जागेची मोजणी केल्यानंतर तात्काळ क्षेत्रफळ निश्चित होत असून रियल टाइम कायनेमेटीक जीपीएस पद्धतीमुळे कोणत्याही स्थानकाचे तीन ते पाच सेंटीमीटर अचूकतेपर्यंत काही सेकंदांत निरीक्षण करणे व नोंदी घेणे शक्य झाले आहे. शिवाय या नोंदी खऱ्या निर्देशांक ट्रू कॉर्डिनेट्स स्वरूपात मिळत असल्यामुळे कोणत्याही जमिनीच्या कोपऱ्याचे अक्षांश व रेखांश बेड व त्याचे स्थान निश्चिती करणे रोव्हरद्वारे शक्य झाले आहे. वैश्विक स्थान निश्चिती व नकाशे निर्मितीसाठी ग्लोबल नेव्हिगेशन सॅटॅलाइट सिस्टम प्रणालीचा वापर १९८०  पासून सातत्याने वाढत असून काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निरंतर संचालन संदर्भ केंद्रामुळे प्रत्यक्षात अचूकपणे मोजणी करण्यास लाभदायी ठरणार आहे.

जमीन मोजणी तंत्रज्ञानात सातत्याने बदल

भारतात सर्वे ऑफ इंडियाची स्थापना १७६७ साली झाली व तेव्हापासून मोजणीचे काम, जागेचे सर्वेक्षण त्यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे. मात्र मोजणीचे प्रमाण कमी अचूक असल्याने स्थानिक स्तरावर निर्मित केलेल्या टोपोशीटचा वापर अल्प प्रमाणात होत होता. १९२० च्या सुमारास प्लेन टेबलचा वापर करून पोट हिस्सा मोजणी राज्यात सुरू झाली व तेव्हापासून सन २००० पर्यंतच्या कालावधीत प्लेन टेबल मोजणी पद्धतीनेच काम सुरू राहिले. या प्रणालीतील अंगीभूत दोष तसेच उंच झाडी किंवा पिके असल्यास मोजणीच्या वेळी वारंवार प्लॅन टेबल बदलावा लागत असे व बेसलाइनमध्ये तफावत येण्याचे प्रकार येत असत. त्यानंतर वैश्विक स्थान निश्चिती पद्धतीचा वापर करून भूमापणासाठी मिलिमीटरमध्ये अचूकता असणारे इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन  (एळर)  पद्धत कार्यान्वित झाली. याकरिता ठरावीक ठिकाणी २४ ते ७२ तास उभारणी करून निरीक्षण करावे लागत होते. काही  कालावधीनंतर काही मिनिटांपर्यंत वेळ कमी झाला तरीसुद्धा एका जागेच्या मोजणीसाठी दिवसभराचा कालावधी लागत होता.

रोव्हर पद्धतीचे फायदे

* शेत जमीन किंवा प्लॉटची मोजणी या यंत्राच्या साह्याने पारंपरिक मोजणीच्या पाच ते सहा पट जलद गतीने होईल.

* जीपीएसवर आधारित या रोव्हर मशीनमुळे मोजणीचे काम अचूकपणे होऊन कामाचा दर्जा उंचावेल.

* मोजणीच्या कामात अधिक पारदर्शकता येऊन जमिनीचे रेखांश अक्षांश जमीन मालकाकडे उपलब्ध होतील.

* अपुऱ्या मनुष्यबळाअभावी जिल्ह्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणे जलद गतीने कमी होऊन भूकरमापक यांच्यावरील ताण कमी होईल.

* राष्ट्रीय प्रकल्प व इतर प्रकल्पासाठी भूसंपादन करताना मोजणीची कामे, वन हक्क मोजणी जलद गतीने होईल.

* जागेवर उंच पिके, झाडे, जमिनीत दलदल असे अडथळे असताना देखील रोव्हर पद्धतीने मोजणी करणे शक्य होईल.

* मोजणी करण्यासाठी अवधी कमी लागत असल्याने पावसाळय़ात थोडा वेळ जरी पाऊस थांबला तरी मोजणीची कार्यवाही पूर्ण करता येईल.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या