पालघर : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रामध्ये होणाऱ्या चोऱ्या, घरफोडय़ा, रात्रीचे दरोडे इत्यादी गुन्ह्यांचा तपशीलवार अभ्यास हाती घेण्यात आला असून प्राप्त होणाऱ्या अहवालाच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार दिवसाची तसेच रात्रीची पोलीस गस्त वाढवण्यात येईल, असे प्रतिपादन पालघरचे पोलीस अधीक्षकपदाचा नव्याने पदभार स्वीकारलेल्या बाळासाहेब पाटील यांनी केले.

पोलीस अधीक्षकपदाचा भार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना भेट देऊन त्यांनी एकंदर गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत पाहणी दौरा केला. पालघरचे अपर पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे मॅपिंग अर्थात माहिती संकलन सुरू असून अहवालानंतर ठिकठिकाणी करण्यात येणाऱ्या गस्तीबाबत सुधारित निर्णय जारी करण्यात येतील, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

विविध चोरी, दरोडय़ांमध्ये पळवला जाणारा ऐवज हस्तगत करून तो संबंधितांना परत केल्यास नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास दृढ होण्यास मदत होईल, असे सांगत त्या दृष्टीने पालघर पोलीस दल कृती करेल, असे त्यांनी सांगितले. ८ जून रोजी पालघरजवळील कोळगाव येथे एका जवाहिऱ्याच्या व्यापाऱ्यावर हल्ला करून पळविलेल्या तीन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज पालघर पोलिसांनी हस्तगत केला असून या प्रकरणात सात गुन्हेगारांना अटक केल्याची त्यांनी माहिती दिली.

जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात सध्या दहा-बारा सीसीटीव्ही कॅमेरे असून त्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात संकलित करण्यात येत आहे. पोलीस ठाण्याअंतर्गत शासकीय सीसीटीव्हीची संख्या वाढवावी यासाठी जिल्हा नियोजनमधून अतिरिक्त निधीची मागणी करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हा पोलिसांनी याव्यतिरिक्त तीन हजार ठिकाणे निश्चित केली असून त्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सीसीटीव्ही बसविण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी माहिती दिली.

जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची नोंदणी करणे तसेच त्यांची पोलीस पडताळणी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सर्व संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकारी यांना दिल्या आहेत. पालघर पोलीस ठाणे तसेच पोलीस उपअधीक्षक कार्यालयासाठी स्वतंत्र कार्यालय उभारण्यासाठी जागा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांना पाचारण करण्यात आल्याची माहिती बाळासाहेब पाटील यांनी दिली.

जिल्ह्यासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग निर्माण करणे

जिल्हा स्थापन झाल्यापासून मनुष्यबळाची मर्यादा लक्षात घेता अजूनही जिल्ह्यात स्वतंत्र वाहतूक नियंत्रण विभाग (ट्रॅफिक) अस्तित्वात नाही. जिल्ह्यात सुमारे २०० कर्मचाऱ्यांची जागा रिक्त असून जिल्ह्यात नव्याने वाहतूक नियंत्रण विभाग उभारला जाईल, असे त्यांनी सांगितले. ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या पालघरमधील वाहतूक कोंडीच्या वृत्ताचा उल्लेख करत त्यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेशी समन्वय साधण्याचा पोलीस उपविभागीय अधिकारी व प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.