चार लाख ३१ हजार नागरिक लाभार्थी
पालघर : जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागांत लसीकरणासाठी नागरिक पुढे येत नसताना पालघर तालुक्याने पहिल्या मात्रेचा लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. सुमारे चार लाख ३० हजारपेक्षा अधिक नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. पालघर जिल्ह्यात २५ लाख ४७ हजार लसीकरणासाठी लाभार्थी संख्या असल्याचे अंदाजित करण्यात आले असून त्यापैकी पहिल्या टप्प्यातील चार लाख ३१ हजार १९० नागरिकांचे लसीकरण तालुक्याने २० डिसेंबर रोजी पूर्ण केले. जिल्ह्यातील वसई ग्रामीण तालुक्याने आजवर एक लाख सात हजार लसीकरण (११२ टक्के) तर वसई-विरार महानगरपालिकेने नऊ लाख ९६ हजार (८६ टक्के) लसीकरणाची पहिली मात्रा पूर्ण केली आहे.
जिल्ह्यातील २१ लाख पाच हजार नागरिकांची लसीकरणाची पहिली मात्रा पूर्ण झाली असून उद्दिष्टाच्या तुलनेत ८३ टक्के लसीकरण अंशत: झाले आहे. तर १४ लाख ४७ हजार नागरिकांचे (५७ टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे. पालघर जिल्ह्यात तलासरी, मोखाडा, डहाणू व जव्हार तालुक्यातील लसीकरण पिछाडीवर पडल्याचे दिसून येत आहे.
१०० टक्के लसीकरण गाठणे आव्हानात्मक
जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी करोनाच्या संक्रमणाच्या काळात मूळ गावी स्थलांतर केले आहे. तसेच इतर काही नागरिकांनी मुंबई, ठाणे किंवा गुजरात राज्यांत लशीची पहिली मात्रा घेतल्याने लसीकरणासाठी असणाऱ्या लाभार्थी संख्या गाठणे हे जिल्हा प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरत आहे. पहिल्या लसमात्रेच्या तुलनेत दुसऱ्या लसमात्रा घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे.
पालघर तालुक्यात लसीकरणाच्या पहिल्या मात्रेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन व सहकार्य तसेच तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सामाजिक संस्था व स्वयंसेवकांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे.
– डॉ. अभिजीत खंदारे, तालुका वैद्यकीय अधिकारी, पालघर